'मुंबई नाक्या'वर ट्रॅफिकवर चर्चा

  मुंबई  -  

  दादर - 'मुंबईतील ट्रॅफिक समस्या' विषयावर 'मुंबई लाइव्ह'च्या मुंबई नाका या विशेष कार्यक्रमात चर्चा झाली. यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीचे प्रवक्ता रवींद्र पवार,भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ, सामाजिक कार्यकर्ते अजित शिनॉय आणि अभिनेते अभिराम भडकमकर यांनी आपले विचार मांडले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेल्याचं राष्ट्रवादी प्रवक्ते रवींद्र पवार यांनी सांगत त्यासाठी बेस्ट प्रशासनाचे चुकीचे धोरणही कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मुंबईमध्ये काही मोठे पूल,मुंबईच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणारे रस्ते बांधले गेल्याचं सांगत त्यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली. दरम्यान लोक वाहन चालवताना शिस्तीचे भान ठेवत नाही, दुचाकी वाहनांसाठी वेगळे मार्ग बनविण्यात आले नाहीत, त्याचबरोबर मुंबईसारख्या शहराला समुद्र असूनही सागरी वाहतूक व्यवस्था अद्याप निर्माण करण्यात आली नसल्याची प्रतिक्रीया अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी दिली. तर वाहतुकीचा विचार करताना पादचारीचा विचार बिलकुल केला जात नाही. त्यांना चालायलाही फुटपाथ नाही अशी अवस्था सध्या मुंबईची झाल्याची प्रतिक्रीया सामाजिक कार्यकर्ते अजित शिनॉय यांनी दिली. दरम्यान भाजपा प्रवक्ते अवधुत वाघ यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात नवीन रस्ते आणि पूल बनले असले तरी विकासाची गती होऊ शकली नसल्याची टीका त्यांनी केली. महापौर, नगरसेवक यांच्यापेक्षा जास्त अधिकार आयुक्त, प्रशासन यांना आहेत यावर रवींद्र पवार आणि अवधूत वाघ यांचे या चर्चेत एकमत झाले.

  'मुंबई नाका' या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात अभिराम भडकमकर यांनी मुंबईकरांना संपूर्ण मुंबईचा विचार करून मतदान करावे असं आवाहन केले. मुंबईची वाहतूक सुव्यवस्थित करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थेचे समनव्य असणे गरजेचे आहे, असे मत अजित शिनॉय यांनी मांडलं. मुंबईमध्ये आयुक्त बदलले की संपूर्णपणे मुंबईच्या विकासाची दिशा आणि धोरण बदलून जाते, हे कुठेतरी थाबंणे गरजचे असल्याचं मत रवींद्र पवार यांनी व्यक्त केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.