Advertisement

मराठी तरूणाचे विमान अखेर भरारी घेणार, डीजीसीएचा हिरवा कंदील!


मराठी तरूणाचे विमान अखेर भरारी घेणार, डीजीसीएचा हिरवा कंदील!
SHARES

मुंबईकर अमोल यादव यांनी बनवलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या वहिल्या विमानाची चाचणी घ्यायला अखेर डीजीसीएने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे एका मुंबईकराचे हे संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान लवकरच प्रत्यक्ष धावपट्टीवरून धावल्यास आश्चर्य वाटायला नको.

मुंबईच्या आपल्या घरी गच्चीवरच अमोल यादव यांनी विमान बनवण्याच्या कामाचा शुभारंभ केला. मूळचे साताऱ्याचे असणारे अमोल यादव गेल्या 18 वर्षांपासून त्यांच्या या कल्पनेवर काम करत आहेत.



सहा वर्षांच्या पाठपुराव्याला यश

डीजीसीएकडून विमानाच्या चाचणीसाठी परवानगी मिळाल्यानंतर अमोल यादव यांनी सोमवारी मंत्रालयात येऊन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. डीजीसीएच्या रजिस्ट्रेशनसाठी अमेल यादव यांनी 2011 साली अर्ज केला होता. अखेर 17 नोव्हेंबर, 2017 रोजी म्हणजेच तब्बल सहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर डीजीसीएने त्यांच्या सहा आसनी विमानाला नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे.



पुढच्या 10 दिवसांत होणार तपासणी

पुढच्या 10 दिवसांत या विमानाची तपासणी होणार असून, यादरम्यान उड्डाणासाठी आवश्यक तो हिरवा कंदील मिळण्याचीही शक्यता आहे. काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्याची तयारी आणि पुन्हा त्यावर मेहनत घेण्याची तयारी अमोल यांनी दर्शवली आहे. एवढेच नव्हे, तर यादव यांना सरकारने पालघर इथे विमान निर्मितीसाठी काही एकर जागाही देण्याची तयारी दर्शवली आहे. याप्रकरणी अमोल यादव यांना सर्व सहकार्य केले जाईल आणि सरकार त्यांच्या पाठिशी उभे राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहे.


डीजीसीएकडून लागला होता ब्रेक

डीजीसीएकडून अमोल यादव यांना परवानगी देण्यात सातत्याने अडथळे आणले जात होते. 'अर्ज हरवला', 'नियम रद्द केले' अशी अनेक कारणे अमोल यादव यांना डीजीसीएकडून देण्यात आली. 2016 च्या मेक इन इंडिया प्रदर्शनात त्यांनी आपले विमान सादर केले. तेथेही त्यांना मोठा विरोध झाला. मात्र, त्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी 4 वेळा यासाठी बोलणी केली आणि अखेर डीजीसीएला त्याची दखल घ्यावी लागली.



विमानाचे नाव - VT-NMD

भारतात, विशेषतः महाराष्ट्रात विमान निर्मिती सुरू करण्याचे स्वप्न हे अमोल यादव यांच्या एकट्याचे स्वप्न राहिले नसून, आता ते पंतप्रधान आणि पर्यायाने महाराष्ट्र सरकारचे स्वप्न झाले आहे. त्यामुळेच या विमानाचे नाव VT-NMD आहे. NM म्हणजे नरेंद्र मोदी आणि D म्हणजे देवेंद्र असा त्याचा अर्थ होत असल्याचे अमोल यादव यांनी सांगितले.



हेही वाचा

भारताच्या मानुषी छिल्लरनं पटकावला 'मिस वर्ल्ड'चा किताब


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा