केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठीच्या गाइडलाइन्स जारी केल्या असून या गाइडलाइन्सनुसार येत्या १५ आॅक्टोबरपासून देशभरातील शाळा टप्प्याटप्प्याने उघडणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार? याकडे राज्यभरातील तमाम पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. (discussion on school reopening in maharashtra at cabinet meeting)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली तसंच महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. त्यात विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा विषय म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा कधी सुरू होणार या विषयावर देखील चर्चा झाली. यामागचं कारण म्हणजे केंद्र सरकारने २ दिवसांपूर्वीच शाळा सुरू करण्यासंबंधी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. तसंच शाळा सुरू करायच्या की नाहीत हे ठरवण्याचा अधिकार संबंधित राज्यांना दिला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही सर्वात मोठी बातमी असून महाराष्ट्र सरकार मात्र या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात करणार की नाही? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा- तोपर्यंत महाराष्ट्रात एकही महाविद्यालय सुरू करणार नाही- उदय सामंत
त्यामुळे या विषयावर देखील गांभीर्याने चर्चा झाली. परंतु राज्यातील शाळा वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. ऑनलाईन शिक्षण सुरु झालं आहे. याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले.
केंद्राच्या गाइडलाइननुसार आधी वरच्या इयत्तेतील आणि मग हळूहळू खालच्या इयत्तेतील शाळा सुरु करण्यात येतील. शाळा सुरु करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या पातळीवर बनवायची आहे. या मानक कार्यप्रणातील विद्यार्थ्यांचं आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, सुरक्षित सामाजिक अंतर याची काळजी घेण्याची जबाबदारी ही पूर्णत: राज्य/केंद्रशासित प्रदेशांची असणार आहे.
हेही वाचा- १५ आॅक्टोबरपासून शाळा उघडणार, सरकारच्या गाइडलाइन्स जारी