Advertisement

राज ठाकरेंना होती नगरसेवक फुटण्याची भीती?


राज ठाकरेंना होती नगरसेवक फुटण्याची भीती?
SHARES

मुंबई महापालिकेतील मनसेचे काही नगरसेवक फुटून शिवसेनेत जाणार असल्याची कल्पना खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना होती, अशी माहिती आता समोर आली आहे. एक महिन्यापूर्वी दिलीप लांडे यांनी राज गडवर सर्व नगरसेवकांनी बैठक बोलावून याची कल्पना राज ठाकरेंना दिली होती. पण या बैठकीला राज ठाकरेच हजर राहिले नाहीत. त्यामुळे आपले नगरसेवक फुटण्याची बातमी त्यांनी गंभीरतेने घेतली नसल्यामुळेच आज या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.


मनसेच्या 6 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

मनसेच्या सहा नगरसेवकांनी शुक्रवारी आपला एक स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, हा निर्णय त्यांनी एकाच दिवसात घेऊन शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे दिलीप लांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मनसेच्या ज्या सहा नगरसेवकांनी पक्षाला राम राम केला, त्या सर्वांची पहिली बातमी दिलीप लांडे यांनीच फोडली होती. यासाठी राजगडावर एक महिन्यापूर्वी सर्व नगरसेवकांची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत राज ठाकरे यांना मार्गदर्शन करण्याचीही विनंती केली होती. परंतु, प्रत्यक्षात राज ठाकरे हे या बैठकीला उपस्थितच राहिले नाही. त्यामुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती, असे ऐकायला मिळत आहे. 

दिलीप लांडे यांनी एक महिन्यापूर्वी राजगडवर सर्व नगरसेवकांची एक बैठक बोलावण्यात आल्याची कबुली देत या बैठकीला राज साहेब आले नव्हते, असे सांगितले. मात्र, ही बैठक कशासाठी होती? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.


नगरसेवकांमध्ये आपल्याच पक्षाध्यक्षांबाबत तीव्र नाराजी

मागील महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांमध्येही आपल्या पक्षाच्या अध्यक्षांबाबत तीव्र नाराजी होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नगरसेवकांशी संवाद साधत नाहीत, तसेच त्यांना आपल्या नगरसेवकांची ओळख नसल्याची खंत त्यांच्या नगरसेवकांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे हीच चीड पुन्हा एकदा या महापालिकेत खदखदून आली आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांशी संवाद साधण्याऐवजी पराभूत उमेदवारांवरच साहेबांचा अधिक विश्वास आहे असा विद्यमान नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता.


...म्हणून, दिलीप लांडेंनी सेनेत केला प्रवेश

चार दिवसांपूर्वी फेरीवाल्यांच्या मुद्दयावरून राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या भेटीची जबाबदारी महापालिका गटनेते दिलीप लांडे यांच्यावर सोपवण्याऐवजी राज ठाकरेंनी पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर सोपवली होती. देशपांडे यांनी आयुक्तांची वेळ घेऊन भेट निश्चित केली. परंतु, गटनेते असलेल्या लांडे यांना भेटीच्या काही तासांपूर्वी कल्पना देण्यात आली. त्यामुळेही नाराजीचा सूर नगरसेवकांमध्ये उमटला होता. त्यामुळे आधीची खदखद आणि राज साहेबांच्या महापालिका भेटीदरम्यान दिली न गेलेली कल्पना यामुळेही मनसे नगरसेवकांची नाराजी पराकोटीला जाऊन त्यांनी अखेर शिवसेनेत जाण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.


रस्त्यांवर नाही तर घरोघरी फिरतोय

मनसेचे सहा नगरसेवक फुटल्यानंतर काही मनसैनिकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून ‘राज साहेब आदेश द्या, त्या नगरसेवकांना रस्त्यांवर फिरू देणार नाही,’ असा इशारा दिला. या पोस्टचा दिलीप लांडे यांनी समाचार घेत, आम्ही रस्त्यांवरून फिरत नाहीत, तर लोकांच्या घरोघरी फिरतो, असे सांगितले. मी स्वत: सकाळपासून शाखेतच बसून आहे. माझे अन्य सहकारी नगरसेवक दिवाळीचे उटणे वाटत घरोघरी फिरत आहेत. त्यामुळे कुणाच्या धमक्यांना मी किंवा आमचे नगरसेवक भीत नसल्याचे लांडे यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा - 

मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, भाजपाचं आव्हान घेतलं अंगावर

थिअऱ्यांचं राजकारण आणि जनतेलाच मुरडा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा