Advertisement

शिवसेनेच्या महापालिका नेत्यांपुढे 'नवं' आव्हान


शिवसेनेच्या महापालिका नेत्यांपुढे 'नवं' आव्हान
SHARES

महापालिका गटनेते दिलीप लांडे यांच्यासह मनसेच्या ६ नगरसेवकांनी स्वतंत्र गट करून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सत्ताधारी पक्षाचं वजन महापालिकेत वाढलं आहे. दिलीप लांडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेला महापालिकेत सभागृहनेतेपदाचा चेहरा मिळाला असून विद्यमान सभागृहनेते यशवंत जाधव यांच्यासह रमेश कोरगावकर, मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे.


'यांचं' स्वप्न भंगलं

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सभागृह नेतेपदाचे दावेदार असलेले मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांची नावे मागे सारून शिवसेनेने माझगावमधील शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांना सभागृह नेते बनवलं. त्यानंतर महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर, तर स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश कोरगावकर यांची निवड केल्यामुळे सातमकर आणि चेंबूरकर यांचं स्वप्न भंगलं. आता मनसेतून शिवसेनेत आलेल्या दिलीप लांडे यांच्यामुळे या दोघांना आणखी एक प्रतिस्पर्धी वाढला आहे.


सभागृहात वेगळी छबी

दिलीप लांडे हे सर्वात जुने शिवसैनिक आहेत. ते स्वतः शिवसेनेतून तीन वेळा तर त्यांची पत्नी शैला लांडे यांनी दोन वेळा नगरसेवकपद भूषवलं आहे. पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नगरसेवक असलेले लांडे दांपत्य हे दोन वेळा शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यातच लांडे हे मनसेचे दोन वेळा गटनेते राहिलेले असल्याने तसेच त्यांचं वक्तृत्वही चांगलं असल्यामुळे सभागृहात आणि समित्यांच्या बैठकीत त्यांची वेगळी छबी पाहायला मिळत आहे.


महापालिकेतील आवाज बुलंद

प्रशासनाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे दिलीप लांडे यांच्या माध्यमातून शिवसेनेचा महापालिकेतील आवाज बुलंद झाला आहे. लांडे यांच्या प्रवेशामुळे सभागृहनेते यशवंत जाधव यांच्यासमोरही मोठं आव्हान निर्माण झाले आहे.

लांडे मूळचे शिवसेनेचेच असल्यामुळे त्यांना महत्त्वाचं पद देताना कोणताही अडथळा निर्माण होणार नसल्याचं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. सध्या महापालिकेत शिवसेना ज्या गर्तेतून जात आहे, ते पाहता दिलीप लांडे यांची एन्ट्री महत्त्वाची मानली जात आहे. भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता त्यांच्यावर कोणती जबाबदारी टाकतात याकडेच सर्वांचं लक्ष आहे.


स्थायी समितीत एक सदस्य वाढणार

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी १० सदस्य असून मनसेच्या ६ सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे स्थायी समितीतील शिवसेनेचे संख्याबळ ११ वर पोहोचणार आहे. 

मनसेचा सध्या स्थायी समितीत एक सदस्य असून हाच सदस्य आता शिवसेनेच्या संख्येत जोडला जाणार आहे. मात्र, भविष्यात काँग्रेसचे १० ते १२ सदस्य फुटल्यास याचा फटका भविष्यात सपालाही बसणार असून त्यांचे महापालिकेतील एकमेव सदस्य असलेले अस्तित्वच संपण्याची भीती आहे.


हेही वाचा - 

ऐतिहासिक! पक्षांतरबंदी कायद्यानंतर महापालिकेत पहिल्यांदाच फुटले नगरसेवक

मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, भाजपाचं आव्हान घेतलं अंगावर



ऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा