Advertisement

शिवसेना दिवाळीपूर्वीच फोडणार फटाका?


शिवसेना दिवाळीपूर्वीच फोडणार फटाका?
SHARES

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का? अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यातच सोमवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेने दिवाळीपूर्वीच राजकीय फटाका फोडण्याची तयारी सुरू केली आहे. हा फटाका सत्तेतून बाहेर पडण्याचा असल्यास त्याचा भाजपाला कितपत 'फटका' बसेल हाच खरा प्रश्न आहे.


काम होत नाहीत...

शिवसेना आमदारांची कामेच होत नसल्याची खंत मातोश्रीवरील बैठकीत पुन्हा एकदा शिवसेना मंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवली. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेवटचं अल्टीमेटम देण्याची दाट शक्यता आहे. विकासकामे होत नसतील, तर आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, तुमची मानसिकता आहे का? असे उद्धव ठाकरेंनी आमदारांना विचारल्यावर आमदारांनीही तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमच्या सर्वांचे समर्थन असल्याचं आमदारांनी सांगितल्याचं कळत आहे.

सत्तेत राहायचं की सत्तेबाहेर याचा निर्णय आता सर्वस्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा देतात की सत्तेतून बाहेर पडतात, हे लवकरच समजेल. अशा पद्धतीचा निर्णय घेण्याच्या जवळपास पोहोचलो आहोत असं सूचक वक्तव्य देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


मातोश्रीवर 'मोबाईल बंदी'

मातोश्रीवरील बैठकीत आमदार आणि मंत्र्यांना मोबाईल बाळगण्यास बंदी घालण्यात आली होती. शिवसेनेतल्या डॅमेज कंट्रोलसाठी ही रणनिती आखल्याचं म्हटलं जात आहे. मागच्या बैठकीत जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. या वादाची दृश्ये मीडियापर्यंतही पोहोचली होती. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाने यंदा खबरदारी घेतली.


मंत्री, आमदारांमधील वाद चव्हाट्यावर

शिवसेनेतील अंतर्गत वाद या बैठकीत पुन्हा एकदा समोर आला. रायगडमधील आ. भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात हा वाद झाला. आगामी निवडणुकीत मंत्र्यांची भूमिका काय असणार?, असा प्रश्न आ. गोगावलेंनी विचारला. तसेच राणे जेव्हा पक्ष सोडून चालले होते, तेव्हा कोण निष्ठावंत होते, हे आम्हाला चांगलं माहीत आहे. आमच्या सारखे शिवसैनिक खंबीरपणे पक्षासोबत उभे होते. तेव्हा मंत्र्यांना आमच्याशी नीट बोलायला सांगा, आम्हाला मंत्री बनायचे नाही. 

ग्रामपंचयातीच्या निवडणुका आल्या आहेत. आमचे मंत्री आम्हाला किती आर्थिक पाठबळ देणार...? हे त्यांनी आता सांगावं, असेही गोगावले म्हणाले. यावर रामदास कदम गोगावलेंना उद्देशून म्हटले की, सर्व मंत्र्यांना एका पिंजऱ्यात उभं करु नका. सरळ मंत्र्यांचं नाव घ्या. त्याचसोबत, मी आत्ताच्या आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे, असेही कदम म्हणाले.

दरम्यान, बैठकीत शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि खा. श्रीरंग बारणे यांच्यातही खडाजंगी झाली. निलम गोऱ्हेंच्या वाढदिवसाला लक्ष्मण जगताप त्यांना भेटले होते. यावेळी निलम गोऱ्हेंनी जगताप यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. या गोष्टीवरुन खा. बारणेंनी गोऱ्हेंना उद्देशून, असे निर्णय घेण्याचे अधिकार गोऱ्हेंना कोणी दिले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर माझी शिवसेनेवरची निष्ठा काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. मला माझी निष्ठा कोणाला सांगायाची गरज नाही, असे प्रतिउत्तर गोऱ्हे यांनी दिले.

शिवसेनेची निर्णायक बैठक पार पडली. बैठकीला सर्व आमदार, खासदार आणि नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांचे ऐकून घेतले. महाराष्ट्रात महागाई वाढल्यामुळे प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा फटका शिवसेनेला बसू नये, यासाठी राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. सरकारच्या भविष्याविषयी काय निर्णय घ्यावा. सत्तेत राहायचे नाही, यावर देखील चर्चा झाली.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना


सत्तेतून बाहेर पडावे, अशी शिवसेनेच्या आमदारांनी मागणी केली आहे. आमदारांची कामे होत नाहीत. त्यामुळे सत्ता आपली आहे का? असा सवाल देखील आमदारांनी केला आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारपासून आमदारांच्या बैठका घेणार आहेत. शिवसेना सत्तेसाठी नाही, तर जनतेसाठी आहे. सतेमध्ये राहून काम होत नाहीत, मंत्र्यांना खाती दिली पण अधिकार नाही. त्यामुळे लवकरच निर्णय घेणार.
- रामदास कदम, पर्यावरण मंत्रीहेही वाचा -

आ. कातेंची नाराजी दूर करण्यात 'शिवसेना भवन'ला यश!

भांडुपच्या पोटनिवडणुकीत कोण कमकुवत, कोण भक्कम? वाचा...डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा