Advertisement

भांडुपच्या पोटनिवडणुकीत कोण कमकुवत, कोण भक्कम? वाचा...


भांडुपच्या पोटनिवडणुकीत कोण कमकुवत, कोण भक्कम? वाचा...
SHARES

भांडुप पश्चिमेकडील काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघातील पोटनिवडणूक ही शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आल्या असल्या तरी प्रमिला पाटील यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपाची बाजू भक्कम झाली आहे. मात्र, शिवसेनेची बाजू कमकुवत असून या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने मुंबईतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींवर विशेष जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे समजते.

भांडुप पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक ११६ मधून काँग्रेसच्या प्रमिला कमलाकर पाटील या ८३२६ मते मिळवून विजयी झाल्या होत्या. या मतदार संघातून विद्यमान शिवसेना आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मिनाक्षी पाटील यांना ७८५७ मते मिळाली होती. अवघ्या ५०० मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. परंतु, निवडून आलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका दि. प्रमिला पाटील यांचे काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात येत्या ११ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत असून १२ ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमिला पाटील यांचा मुलगा कौशिक पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असून भाजपानेही त्यांची वहिनी जागृती प्रतिक पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. मात्र, शिवसेनेची अद्याप उमेदवारासंदर्भात अद्याप चाचपणी सुरू आहे. या निवडणुकीत मिनाक्षी पाटील दुसऱ्या क्रमांकावर असल्या, तरी अशोक पाटील यांना विभागातील लोकांचा विरोध लक्षात घेता त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, दुसरा चेहरा शिवसेनेकडे नसून त्याचा शोधही शिवसेनेकडून सुरु आहे.

भांडुपमधील बीपीईएस या शाळेजवळील प्रांगणात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसेना नेते लिलाधर डाके, खासदार विनायक राऊत, आमदार अशोक पाटील, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, विभागप्रमुख दत्ता दळवी, महिला विभाग संघटक संध्या वढावकर यांच्यासह विभागातील नगरसेवकांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोणीही उमेदवार दिला तरी आपला उमेदवार हा धनुष्यबाणच असेल, असे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले. हा मतदार संघ संमिश्र असला तरी आजवरची पोटनिवडणुकीची शिवसेनेची रणनिती पाहता, आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी याठिकाणी मुंबईतील तसेच कोकणातील सर्व शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर प्रचाराची जबाबदारी टाकण्यात येत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मनोज कोटक यांनी भांडुपमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूकही पैशाच्या जोरावरच होण्याची भीती शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे. याबाबत भाजपाचे महापालिका गटनेते आणि या मतदारसंघाची जबाबदारी संभाळणारे मनोज कोटक यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगितले. पक्षाच्यावतीने जो उमेदवार दिला जाणार आहे, त्याला निवडून आणण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना काय करणार आहे, यापेक्षा आम्ही कसे जिंकू हेच आमचे ध्येय असल्याचे कोटक यांनी सांगितले.


हेही वाच - 

माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचे निधन



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा