Advertisement

उठसूठ पक्षशिस्त मोडू नका, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

उठसूठ पक्षविरोधी बोलाल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष ​चंद्रकांत पाटील​​​ यांनी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

उठसूठ पक्षशिस्त मोडू नका, चंद्रकांत पाटील यांचा इशारा
SHARES

पक्षाच्या निर्णयाबाबत एखाद्या नेत्याचा आक्षेप असेल, तर त्याने पक्षाच्या व्यासपीठावर येऊन चर्चा करावी, पक्षशिस्त मोडून उठसूठ पक्षविरोधी बोलाल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी परळीतील गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाषण करताना पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता राज्यातील पक्ष नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. मागील अनेक दिवसांपासून मौन बाळगून असलेल्या या दोन्ही नेत्यांनी कुणाचीही तमा न बाळगता बंडखोरीवर थेट भाष्य केलं. त्यामुळे आतापर्यंत या नेत्यांच्या नाराजीवर भलेही पक्षाकडून पांघरून घालण्यात येत असली, तरी या मेळाव्यात ही नाराजी उघडपणे समोर आली. यावेळी तिथं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. 

हेही वाचा- हवं तर मला पक्षातून काढा, पंकजा मुंडेंचं पक्षनेतृत्वालाच आव्हान

त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, परळीच्या मेळाव्यात काहींनी बंडाची भाषा केली. बंड केल्याशिवाय न्याय मिळत नाही, असं ते म्हणाले. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दाखले दिले. शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध बंड केलं. सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. यापैकी कुणीही आपल्याच लोकांविरुद्ध बंड केलेलं नाही. तेव्हा मतभेद असायला पाहिजेत. पण ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडले गेले पाहिजेत. तेव्हाच त्यातून मार्ग काढता येईल.

सध्या केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण आहे. पक्षाविरोधातील कारवाया खपवून घेतल्या जात नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला सर्वांनी हे पाहिलंच आहे. तेव्हा उठसूठ पक्षशिस्त मोडू नका. पक्षविरोधात बोलू नका, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, अशा इशाराही पाटील यांनी दिला.

हेही वाचा- गोपीनाथ मुंडे असते, तर माझ्यावर अन्याय झाला नसता… खडसेंची खंत

परळीतील उपस्थितीविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, मला अनेकांनी सांगितलं होतं की या मेळाव्याला जाऊ नका. पण मी तिथं गेलं नसतो तर या प्रकरणाची तीव्रता वाढली असती. मात्र तिथं गेल्यानंतर जे काही चित्र दिसलं ते वेदनादायी होती. इतकंच मी म्हणेन. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा