Advertisement

तृतीयपंथी समाजाला मिळणार सरकारी योजनेचा लाभ


तृतीयपंथी समाजाला मिळणार सरकारी योजनेचा लाभ
SHARES

तृतीयपंथीयांच्या विविध संघटनांसोबत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस सचिव विनिता सिंघल, तृतीयपंथीयांच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठींसहित तृतीयपंथी सदस्य हजर होते. काही दिवसांपूर्वीच तृतीयपंथी संघटनांच्या सदस्यांनी पंकजा मुंडे भेटण्यासाठी वेळ देत नाहीत म्हणून त्यांच्या कार्यालयातच गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी महिला व बालविकास विभागामार्फत कल्याणकारी मंडळ कार्यान्वित केले जाईल. तसेच महिला व बालविकास विभागामार्फत कार्यकारी समिती नेमून त्यामार्फत तृतीयपंथीयांसाठी प्रस्तावित असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

तृतीय पंथीयांचा विषय हा महिला व बालविकास विभागानेच हाताळावा, अशी इच्छा यावेळी तृतीयपंथी संघटनांनी व्यक्त केली. त्यानुसार तृतीयपंथीयांच्या विषयासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत एक कार्यकारी समिती नेमून त्यामार्फत केंद्र शासनाच्या पाच योजना आणि राज्य शासनाच्या विविध योजना राबवण्यात येतील.

तीन वर्षांपूर्वी तृतीयपंथीयांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला होता. हा ठराव मंजूर होऊन तीन वर्ष उलटल्यानंतरही देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नव्हती. काही दिवसांपासून तृतीयपंथीनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता योजनेला बळ मिळाल्याचे तृतीयपंथी संघटनांनी म्हटले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा