Advertisement

मनसेच्या पुढाकारामुळे 'एवढ्या' रिक्षामालकांना ईएमआयमध्ये सवलत, दंडही माफ


मनसेच्या पुढाकारामुळे 'एवढ्या' रिक्षामालकांना ईएमआयमध्ये सवलत, दंडही माफ
SHARES

रिक्षा चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं अनेकांचे रोजगार गेले असून, आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांचा समावेश असून त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुढाकार घेतला आहे. लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीमुळे राज्यातील रिक्षा मालकांना ५ महिने कोणत्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. अशा स्थितीत रिक्षासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता आणि अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडे आल्या होत्या.

यासंदर्भात बजाज कंपनीकडून रिक्षा कर्ज ग्राहकांना सहकार्य व्हावे, यासाठी मनसेने आधी बजाज कंपनीशी पत्रव्यवहार केला आणि नंतर गोरेगाव येथील बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक देऊन रोखठोक इशारा दिला. यानंतर बजाज फायनान्सचे वरिष्ठ अधिकारी आणि मनेसेचे संजय नाईक, कीर्तिकुमार शिंदे यांच्यात चर्चेच्या दोन फे-या झाल्या. या चर्चेत मनसेने सुचवलेली योजना बजाज फायनान्सनं मान्य करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यामुळे बजाज फायनान्सला आपल्या एक लाख १९ हजार ७४३ रिक्षा कर्ज ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याचा निर्णय घेणे भाग पडल्याची माहिती, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक आणि सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मुंबईत ‘महाराष्ट्र गड’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणी गुरुवारी संध्याकाळी उशीरा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योजनेचे लेखी पत्र मनसेला दिले आहेत. 

  • मार्च २०२० ते आगस्ट २०२० या कालावधीत आकारण्यात आलेले धनादेश ईसीएस अनादरीत झालेले शुल्क (बाऊन्स चार्जेस) आणि इतर थकीत शुल्क (अदर ओव्हरड्यू चार्जेस) यांच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम ३० सप्टेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी माफ केले जाईल.
  • ग्राहकाने सप्टेंबर २०२०, आक्टोबर २०२० आणि नोव्हेंबर २०२० या महिन्यात कर्जाच्या हप्त्याच्या तारखेला किंवा त्याआधी ईएमआय भरणा केल्यास उर्वरित थकीत शुल्काची ५० टक्के रक्कम माफ केली जाईल. डिसेंबर २०२०च्या महिन्यात संबंधित कर्ज खात्यात हे दिसून येईल.
  • बजाज आटो फायनान्सच्या मुंबई आणि ठाणे ग्राहकांसाठी सप्टेंबर २०२०च्या महिन्यासाठी आकारण्यात येणारे धनादेश- ईसीएस अनादरित झालेले शुल्क (बाऊन्स चार्जेस) माफ केले जाईल.

फेब्रुवारी २०२०पर्यंत थकबाकी न ठेवता, ज्या ग्राहकांनी मोरॅटोरिअम पॉलिसीचा लाभ घेतलेला आहे, अशा ग्राहकांनाच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या आग्रहावरुन बजाज फायनान्सने ही विशेष आफर दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा