Advertisement

टोल प्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल


टोल प्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल
SHARES

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलवसुलीची रक्कम वसूल होऊन कित्येक महिने उलटले तरी सरकारकडून टोल बंद केला जात नाही. यासंबंधी टोल अभ्यासकांकडून वारंवार टोल बंद करण्याची मागणी होत आहे, पण या मागणीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एमएसआरटीसीकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे आता टोल अभ्यासकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. टोल अभ्यासक संजय शिरोडकर, विवेक वेलणकर, श्रीनिवास घाणेकर आणि प्रविण वाटेगावर यांनी ही तक्रार दाखल केल्याची माहिती विवेक वेलणकर यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.

द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये बरेच झोल झाले असून या झोलचा पर्दाफाश या टोलअभ्यासकांनी केला आहे. त्यातील एका झोलमध्ये 2016 मध्येच टोलवसुलीची संपूर्ण रक्कम टोल कंत्राटदाराने वसूल केली आहे. असे असतानाही 2019 पर्यंत टोल वसुली सुरू राहणार आहे. सर्वसामान्यांचा खिसा कापत या टोलवसुलीतून कंत्राटदार अंदाजे अडीचशे कोटींची अतिरिक्त कमाई करणार आहे. त्यामुळे त्वरित हा टोल बंद व्हावा यासाठी टोल अभ्यासक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पण, टोल काही बंद होत नाही. त्यामुळे शेवटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्याची माहिती तक्रारदार संजय शिरोडकर यांनी दिली आहे. आता या तक्रारीनंतर तरी टोल बंद होतो का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मोपलवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी टोल बंद करण्यासंबंधीचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याचा अधिकार एमएसआरटीसीला नाही. असे असताना एमएसआरटीसीविरोधात तक्रार दाखल झाली असेल तर आम्ही चौकशीला सामोरे जाऊ आणि आमची बाजू मांडू असे 'मुंबई लाइव्ह'ला त्यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा