शिवसेना (shiv sena ubt) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी अखिल भांडुप वारकरी सांप्रदाय मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास हजेरी लावली होती. यावेळी विठुमाऊलींसह संतांचे दर्शन घेतले आणि सामूहिक आरतीमध्ये ते सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
यावेळी ते म्हणाले, “नवीन वर्ष सुरू होऊन 17, 18 दिवस झाले, पण माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. आजचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे. इथे मी या वर्षात पहिल्यांदाच माईक हातात धरला आणि तो ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. पांडुरंगाच्या दर्शनाने या नवीन वर्षाची सुरुवात केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्तेची कास धरणारे अनेक आहेत, पण सत्याची कास धरणारी माणसं फार थोडी राहिली आहेत. जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर, हिंदू धर्मावर संकटं आली त्यावेळी शिवसेनाप्रमुख कणखरपणे उभे राहिले.
गर्व से कहो हिंदू हैं असं संपूर्ण देशभरात म्हणणारे एकमेव व्यक्ती म्हणून बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांना लोक हिंदूहृदयसम्राट म्हणू लागले. त्याआधी माझे वडील व आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी धर्मातल्या वाईट, अनिष्ट रूढी व परंपरांविरुद्ध लढा दिला. मात्र आता जे काही चाललं आहे. धर्म कोणत्या दिशेने चालला आहे, कोण नेत आहे, धर्माच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत हेच कळत नाही आहे”.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मधल्या काळात नीच प्रकार झाला. मी हिंदुत्व (hindutva) सोडल्याचा अपप्रचार केला गेला. पण आम्ही हिंदुत्वाची कास धरलेली आहे. तुमचा विश्वास बसेल का हिंदूहृदयसम्राटांचा पुत्र आणि प्रबोधनकारांचा नातू हिंदुत्व सोडू शकतो का? राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं, मात्र राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हा तेवढाच मोठा अधर्म आहे.
आम्ही हिंदू आहोत, हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून मरणार आहोत. एकमेकांचा सन्मान करणे, मातेचा मान राखणं, आदर राखणे हा सगळा संस्कार आता मागे पडत आहे की काय असा वाटत आहे. ज्या पद्धतीने राज्यकारभार हाकला जात आहे ते पाहून वाईट वाटतं. मला इथे राजकारण आणायचं नसलं तरी आपल्या आयुष्याशी निगडित मुद्दा मांडतोय.”