मुंबईतील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मुंबई महापालिकेकडून मोफत लस देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह महापालिका आयुक्तांची भेट घेतली.
प्रविण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह मुंबई आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुंबईत लसीचं ढिसाळ नियोजन होत असून, महापालिकेने पारदर्शकपणे लसीकरण कार्यक्रम राबवावा तसंच १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस द्यावी, ही मागणी केली. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाकडून आयुक्तांना एक निवेदन सादर करण्यात आलं.
मोफत लसीचा प्रस्ताव ठेवा
ज्यामध्ये मुंबईतील ४५ वर्षावरील नागरिकांना लसीचा ज्यादा पुरवठा करण्याकरिता राज्य सरकारकडे आग्रह धरावा तसंच १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याकरिता राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
हेही वाचा- मुंबईतील कामा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी २०० खाटांचं नियोजन
मुंबईत लसीचं ढिसाळ नियोजन होत असून, महापालिकेने पारदर्शकपणे लसीकरण कार्यक्रम राबवावा तसेच १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस द्यावी, ही मागणी घेऊन मुंबई भाजप अध्यक्ष @MPLOdha जी यांच्यासमवेत भाजपच्या शिष्टमंडळाने आज @mybmc आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली, pic.twitter.com/GRIJJahEqX
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 10, 2021
दुसऱ्या लाटेत काय गौडबंगाल?
RTPCR चाचण्या केल्यानंतर संसर्ग दर २३.४३% पर्यंत कसा गेला, हे मान्य करता मग मासिक संसर्ग दर मार्चमध्ये वाढून ११.२३% व एप्रिलमध्ये १८.०६% पर्यंत गेला, ही माहिती का लपवून ठेवता? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचं गौडबंगाल आहे?, असा प्रश्नही प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार
सोबतच विरोधी पक्ष नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महापालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे, त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेने दिला आहे, असा आरोप देखील प्रविण दरेकर यांनी केला.
(give free covid 19 vaccine to 18 to 44 age group mumbaikars demands bjp leader pravin darekar)