Advertisement

आक्षेपार्ह पुस्तकांचे गठ्ठे गायब केले: विखे पाटील


आक्षेपार्ह पुस्तकांचे गठ्ठे गायब केले: विखे पाटील
SHARES

शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या खुलाश्यावर असहमती दर्शवत शाळेत वितरीत होऊ घातलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर नसल्याचा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा खुलासा चुकीचा असल्याचा दावा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

ज्या पुस्तकांमधील मजकूर वाचून दाखवला, तीच पुस्तकं शाळांमध्ये वितरीत करण्यात येणार होती. परंतु पुस्तकांमधील आक्षेपार्ह मजकूर समोर आणल्यानंतर शिक्षण विभागाने मूळ पुस्तकांचे गठ्ठे गायब केले आणि प्रकाशकांना ५-६ दिवसांत सुधारित पुस्तकं छापण्याची तंबी देण्यात आल्याचंही विखे पाटील म्हणाले.


पुस्तकातून दिवाळी, ईद गायब

पंतप्रधानांच्या जीवनावरील पुस्तकं खरेदी करण्यासाठी सरकारने कोणते निकष लावले? याचंही स्पष्टीकरण विरोधी पक्षनेत्यांनी मागितलं असून, सरकारने तातडीने ही खरेदी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या पुस्तक खरेदीमधील ‘भारत के त्योहार’ पुस्तकातून दिवाळी आणि ईद गायब झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारतातील हे दोन मोठे सणच गायब असतील, तर पुस्तकांना मंजुरी देताना तज्ज्ञ समिती झोपा काढत होती का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


एकाच नावाची दोन पुस्तकं कशी ?

शिक्षणमंत्री म्हणतात की, विरोधी पक्षनेत्यांनी दाखवलेली पुस्तकं कुंभमेळ्यात वितरित झाली होती. शाळांना दिली जाणारी पुस्तकं वेगळी आहेत. पण एकाच प्रकाशकाची एकाच नावाची दोन वेगवेगळी पुस्तके कशी असू शकतात? अशी विचारणाही विखे पाटील यांनी केली. ‘बाल नचिकेत’ या पुस्तकाबाबत खुलासा करताना शिक्षणमंत्र्यांनी ‘ऋषी अत्री’, ‘श्री सारदा माता’ या पुस्तकांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला नाही. यावरून शिक्षणमंत्री लपवाछपवी करीत असल्याचं स्पष्ट होतं.


खुलासा समाधानकारक नाही

या पुस्तकांच्या खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही आरोप विखे पाटील यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत प्रकाशन ‘भारतीय विचार साधना’ यांचे जे पुस्तक २० रूपयाला उपलब्ध आहे, तेच पुस्तक सरकारने चक्क ५० रूपयांत खरेदी केलं असून, या प्रकाशनाकडून तब्बल ८ कोटी १७ लाख रुपयांची खरेदी झाली आहे. ही पुस्तकं तब्बल अडीच पट जादा किंमतीने का खरेदी करण्यात आली? याबाबत शिक्षण मंत्र्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नाही, असंही विखे पाटील म्हणाले.



हेही वाचा-

'ती' पुस्तके 'ही' नाहीत! पुस्तकांतील आक्षेपार्ह मजकुरावर शिक्षणमंत्र्यांचा खुलासा

मीलन, कामातुर, कौमार्यभंग, पाचवीच्या मुलांना अर्थ काय सांगणार?

महापुरूषांच्याही वरचढ 'मोदी भक्ती'चं बजेट, पुस्तक खरेदीसाठी ६० लाखांचा खर्च



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा