Advertisement

बुलेट ट्रेनच्या विषयावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार- रावसाहेब दानवे

कदाचित या प्रकल्पासाठी त्यांचं मन बदललं असेल. त्यानुसार मी त्यांना भेटायला जाणार आहे, अशी माहितीही दानवे यांनी दिली.

बुलेट ट्रेनच्या विषयावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार- रावसाहेब दानवे
SHARES

महाविकास आघाडीची सरकारची अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाही, असं म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

राज्यात भाजप नेत्यांकडून जनआशीर्वाद यात्रा काढली जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्राने जनतेसाठी केलेल्या कामांची माहिती देतानाच महाविकास आघाडी सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या सत्ता कारभारात कुठकुठल्या त्रुटी आहेत, याची माहितीही देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने एकत्र येऊन जनमताच्या विरोधात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलेलं आहे. तर भाजप संख्याबळ अधिक असूनही विरोधी बाकांवर बसलेला आहे. सध्याची राजकीय स्थिती आम्हाला पूर्णपणे अवगत असून आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहोत. सरकार पाडण्याची भाजपला कुठलीही गरज नाही.

हेही वाचा- सर्वाधिक लस मिळूनही महाराष्ट्राची कुरकूर सुरूच- भारती पवार

अमर अकबर अँथनी या सिनेमानुसार या सरकारमधील तिन्ही पक्षांची तोंडं तीन दिशेला आहेत. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाही. एकमेकांच्या पायात पाय घालून, आपापसांतच भांडूनच हे सरकार पडेल. सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढलं, तर नाईलाजाने प्रेक्षकांना सिनेमा सहन करावा लागतो. तसंच काहीसं महाराष्ट्रात चाललंय. पण कधीकधी लोकांच्याच प्रक्षोभातून अनेक चित्रपट बंद पडताना देखील आपण बघितले आहेत. तेव्हा विरोधात असलो, तरी भाजप जनतेच्या हिताच्या कामांना प्रोत्साहन देईल आणि वाईट कामांना विरोध करू, असं रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं. 

विकासकामांचा संदर्भ घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ८ दिवसांपूर्वी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या विषयावर चर्चा करण्यासाठी फोन केला होता. कदाचित या प्रकल्पासाठी त्यांचं मन बदललं असेल. त्यानुसार मी त्यांना भेटायला जाणार आहे, अशी माहितीही दानवे यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा