Advertisement

...नाहीतर पुन्हा लागेल लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, असं म्हणत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

...नाहीतर पुन्हा लागेल लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा
SHARES

कोरोनाच्या वाढत्या आकड्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यासोबतच गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, मोर्चे स्थगित करावेत, अशी विनंतीही राजकीय पक्ष आणि संघटनांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणतात की, ‘हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकानं नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे.

ते हेही म्हणाले की, सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनानं वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचं पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.

मला वारंवार आपणांस हे आवाहन एवढ्याचसाठी करावं लागतं आहे, कारण कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.

महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. नव्हे, कोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेत तिसऱ्या लाटेने जीवन अत्यावस्त केले. चीनही विळख्यात सापडलाय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज ३०,००० नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे खबरदारी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.



हेही वाचा

नायर रुग्णालयाचा शताब्दी सोहळा: गर्दीमुळे मुख्यमंत्री नाराज; महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

ओबीसी आरक्षण... तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यावर सर्वपक्षीय सहमती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा