Advertisement

राणेंच्या 'प्रहार'मध्ये भाजपा 'लयभारी'


राणेंच्या 'प्रहार'मध्ये भाजपा 'लयभारी'
SHARES

गेली अडीच वर्ष राज्य सरकार विशेषत: भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका करणाऱ्या नारायण राणे यांची भाजपाबाबतची भूमिका दिवसेंदिवस मवाळ होत चालली आहे. याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या लातूर महापालिका आणि चंद्रपूरमधील निकालानंतर पहायला मिळाला. नारायण राणेंच्या मालकीचं वृत्तपत्र असलेल्या ‘प्रहार’मध्ये चक्क भाजपाची स्तुती करण्यात आली आहे. काँग्रेसवर भाजपा 'लयभारी' अशा आशयाचे हेडिंग प्रहारच्या पहिल्या पानावर मुख्य बातमीला देण्यात आले आहे. राणेंची भाजपासोबतची वाढलेली जवळीक सगळ्यांच्या भुवया उंचावणारी आहे. 

नारायण राणे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील अशी बातमी 'मुंबई लाइव्ह'ने सगळ्यात आधी दिली होती.

या विषयावर 'मुंबई लाइव्ह'नं आधी दिलेल्या बातम्या पहा-

नारायण राणे यांच्या भाजपाप्रवेशाचा मुहूर्त ठरला

राणेंचा भाजपाप्रवेश 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तामुळे लांबला

निलेश राणे यांची ट्विटरवरून अशोक चव्हाण यांच्यावर टीका


हे बगुन अशोक चव्हाणांनी स्वाताहुन राजीनामा दिला पाहीजे pic.twitter.com/QUvETqiR8W

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 21, 2017



अहमदाबादमध्ये नारायण राणे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसारित झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गाडीमध्ये नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे असल्याचे फोटो आणि व्हिडियो देखील व्हायरल झाले होते. मात्र आपण अमित शहा यांना भेटलोच नसल्याचं सांगत नारायण राणे यांनी बातमीचं खंडन केलं होतं. ‘मुंबई लाइव्ह’ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे लवकरच नारायण राणे हाताची साथ सोडून स्वतःच्या हातात कमळ घेणार आहेत. त्यातच राणेंचे दोन्ही पुत्र सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. 

नितेश राणे यांनी आपले मानधन काँग्रेस पक्षाला देणं टाळतानाच काँग्रेसवर टीका केली होती. त्यातच लातूर आणि परभणीमध्ये काँग्रेसचा 'सुपडा साफ' झाला आहे. याचं खापर नारायण राणे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरच फोडलं. निलेश राणे यांनी देखील ट्विटरवरून अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. त्यातच शनिवारी 'प्रहार'मधून नारायण राणे यांनी भाजपाची स्तुती करून पुन्हा राजकीय चर्चांना वाट करून दिली आहे. या सगळ्यावरून एक मात्र नक्की की, नारायण राणे यांची भाजपाशी जवळीक वाढली आहे आणि राणे नक्कीच राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा