दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला पाहून मला २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
जेएनयूतील विद्यार्थ्यांवर रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात रोष व्यक्त केला जात असून या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांची देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा- मनसे लोणच्याएवढीही उरली नाही, शिवसेना नेत्याची राज ठाकरेंवर टीका
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हल्ला करणारे बुरखाधारी डरपोक होते. त्यांच्यात हिम्मत असेल, तर बुरखा बाजूला करून समोर यावं. हा अतिशय भ्याड हल्ला होता. या हिंसाचाराचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. हा हल्ला पाहिल्यावर मला २६/११ च्या हल्ल्याची आठवण झाली. पोलिसांनी या हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर नि:पक्षपातीपणे कारवाई करावी.
महाराष्ट्रात असा हल्ला खपवून घेतला जाणार नाही. राज्यातील विद्यार्थी सुरक्षित असून त्यांनी काळजी करू नये. गरज पडल्यास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुरक्षाही वाढवण्यात येईल, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा- जेएनयू हल्ला: गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडही आंदोलनात सहभागी