गोपाळ शेट्टी पुन्हा विजयाचा शड्डू ठोकणार का?


  • गोपाळ शेट्टी पुन्हा विजयाचा शड्डू ठोकणार का?
SHARE

मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतलाय. प्रत्येक पक्षाचे उमेदवार मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी जीवाचं रान करताहेत. पण मुंबईतील एक मतदारसंघ असा आहे, ज्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. तो मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपाने गोपाळ शेट्टी यांना पुन्हा उमेदवारी दिलीय. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने उर्मिला मातोंडकर सारख्या ग्लॅमरस चेहऱ्याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलंय.

रेकाॅर्डब्रेक मतं
या मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांचा इतका जबरदस्त होल्ड आहे की, काँग्रेसला या जागेवर सहजासहजी उमेदवार मिळणं देखील मुश्कील झालं होतं. कारण काँग्रेसचे मागचे उमेदवार संजय निरूपम यांनी इथून निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. शेट्टी यांनी २०१४ मध्ये निरूपम यांना साडेचार लाख मतांनी हरवलं होतं. हा आजवरचा रेकाॅर्ड आहे. 
भाजपाची पारंपरिक सीट
या मतदारसंघाला भाजपाची पारंपरिक सीट असं देखील मानलं जातं. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक या मतदारसंघातून ५ वेळा जिंकले आहे. अपवाद फक्त २००४ च्या लोकसभा निवडणुकीचा. त्यावेळी सुपरस्टार गोविंदाने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत राम नाईक यांचा पराभव केला होता. तर २००९ मध्ये इथूनच संजय निरूपम जिंकले होते. मागील ८ पैकी ६ वेळा भाजपा या जागेवर जिंकली आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते
मुंबईतील भाजपाचे ज्येष्ठ नेते अशी गोपाळ शेट्टी यांची ओळख आहे. तीनदा नगरसेवक आणि दोनदा आमदार आणि मुंबई महापालिकेचे उपमहापौर राहिलेले शेट्टी मुंबई भाजपाचे अध्यक्ष देखील हाेते. मागील २७ वर्षांपेक्षा जास्त काळापासून शेट्टी राजकारणात आहेत. पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते अशीही शेट्टी यांची ओळख आहे.

६ निवडणुकींचा अनुभव
पक्षाच्या कार्यकर्त्याच्या रुपात शेट्टी यांनी आपली कारकिर्द सुरू केली होती. त्यानंतर १९९२, १९९७ आणि २००२ मध्ये त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवत विजत मिळवला. पाठोपाठ २००४ आणि २००९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून ते आमदार म्हणूनही निवडून आले. बोरीवली आणि परिसरात शेट्टी यांची चांगलीच पकड असल्याचं मानलं जातं.


ख्रिश्चन धर्मियांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य
ख्रिश्चन धर्मियांसदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही शेट्टी काही काळ चर्चेत राहिले होते. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ख्रिश्चनांचं स्वातंत्र्य लढ्यात कुठलंही योगदान नसल्याचं वक्तव्य केलं होतं. भारतातील ख्रिश्चन केवळ ब्रिटीश होते, त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीत केवळ हिंदू आणि मुस्लिमांचं योगदान होतं, या त्यांच्या वक्तव्यामुळे देशभर खळबळ माजली होती. त्यानंतर शेट्टी यांनी आपल्या पदाचा राजीनामाही देऊ केला होता. परंतु पक्षाने तो नाकारला.


भूखंड घोटाळ्याचे आरोप
शेट्टी यांना आपल्या परिसरात गार्डन सम्राट नावानेही ओळखलं जातं. आपल्या खासदारनिधीचा चांगला वापर करत त्यांनी आपल्या मतदारसंघात ठिकठिकाणी गार्डन उभारले आहेत. मात्र शेट्टी आपल्या मतदारसंघातील महापालिका किंवा सरकारची मोकळी जागा गार्डन बनवण्याच्या नावाखाली ताब्यात घेऊन ती जागा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देत असल्याचेही आरोपही त्यांच्यावर लावण्यात आले. बोरिवलीचं वीर सावरकर उद्यान, कांदिवलीचा पोयसर जिमखाना आणि कांदिवलीचा कमला विहार काॅम्प्लेक्स या उद्यानाच्या जागेवरून शेट्टींवर नेहमीच आरोप होत आलेत.

संपत्तीत ५ वर्षांत ६५ टक्के वाढ
शेट्टी यांच्या संपत्तीत मागील ५ वर्षांत ६५ टक्के म्हणजेच ६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नावे ९.५६ कोटी रुपयांची संपत्ती होती. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या नावे १५.७८ कोटी रुपये संपत्ती असल्याचं दाखवलं आहे.


#MLviews

मुंबईतील भाजपाचे ज्येष्ठ नेते अशी ओळख असलेल्या गोपाळ शेट्टी यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांचा जबरदस्त होल्ड आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम यांना २०१४ मध्ये साडेचार लाख मतांनी हरवलं होतं. तसंच, हा आजवरचा रेकाॅर्ड आहे. त्यामुळं यांचा पराभव करण्यासाठी यंदा कॉग्रेसनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सारख्या ग्लॅमरस चेहऱ्याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं आहे.हेही वाचा -

उत्तर भारतीयांच्या मतांवर जिंकू शकतील का संजय निरूपम?

एकनाथ गायकवाड यांना सर्वसामान्य जनतेची मिळेल का साथ?संबंधित विषय
ताज्या बातम्या