शिवसेनेचा गड असणाऱ्या कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा विजय सहजसोपा?


SHARE

२०१४ साली कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला होता. यावेळीही शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना याच मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. श्रीकांत शिंदे यांनी एम.बी.बी.एस., एम.एस. (ऑर्थोपेडिक्स)चं शिक्षण पूर्ण केलं आहे.

राजकीय कारकीर्द

श्रीकांत शिंदे यांनी २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा तब्बल अडीच लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. तसंच २०१४ पासून ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्यपदीही कार्यरत आहेत. त्यांनी शिवसेनेत येऊन आपल्या वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्यांना सामाजिक कार्याचीही आवड असल्यामुळे ते सर्वांमध्येच परिचयाचे आहेत.

निधीचा पूर्ण वापर

श्रीकांत शिंदे यांची लोकसभेतील उपस्थिती ८३ टक्के असून त्यांनी संसदेत आतापर्यंत ९३० प्रश्न विचारले आहेत. तसंच त्यांना देण्यात आलेल्या विकासनिधीचाही त्यांनी पूर्णपणे वापर केला आहे. याव्यतिरिक्त त्यांनी रेल्वे स्थानकांसाठीही निधी वापरला आहे. त्यांनी अंबरनाथच्या पुढे चिखलोली रेल्वे स्थानकही मंजूर करून घेतलं आहे.

२००९ साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला. या लोकसभा क्षेत्रात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो.

स्थानिक समस्या
या लोकसभा क्षेत्रातील उल्हासनगर आणि कल्याण पूर्व परिसरात पाण्याची मोठी समस्या आहे. तर उल्हासनगरमध्ये सार्वजनिक वाहतुकीचीही मोठी समस्या आहे. याव्यतिरिक्त कल्याण पूर्व परिसरात रस्ते आणि पाण्याची समस्या आजही कायम असून या ठिकाणी मोठं रूग्णालय नसल्यानं रूग्णांना मुंबईतच उपचारासाठी यावं लागतं.


#MLviews

मागील निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेले श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण सुरक्षित मानले जात आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील हे विद्यमान नगरसेवक आहेत. खासदार आणि नगरसेवकातील ह्या सामन्याचं पारडं सध्यातरी शिंदे यांच्या बाजूने झुकल्याचं दिसतं. हेही वाचा  -

ठाण्यात राष्ट्रवादीचं वाढतं वर्चस्व राजन विचारेंना त्रासदायक ठरेल?

आनंद परांजपे तिसऱ्यांदा नोंदवणार का विजय?
संबंधित विषय