महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करून भाषण करत असले, तरी बाळासाहेबांचे खरे वारसदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच असल्याचं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (RPI.A.) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं.
सध्या राज ठाकरे राज्यभरात प्रचारसभा घेत असून सक्षम विरोधी पक्ष बनवण्यासाठी मनसेला मतं द्या, असं आवाहन ते मतदारांना करत आहेत. याच अनुषंगाने बोलताना आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांनी भाषण करण्याची चांगली कला अवगत केली आहे. त्यांच्या सभेला गर्दी होत असली, तरी या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला म्हणावी तेवढी मतं मिळण्याची शक्यता कमी आहे. राज ठाकरेंचे सर्व आमदार त्यांना सोडून गेले आहेत, राज्यात युतीचीच हवा असून यंदाची निवडणूक आम्हाला २०१४ पेक्षाही सोपी आहे, असा दावा त्यांनी केला.
या निवडणुकीत ‘वंचित बहुजन आघाडी’च्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. परंतु, हा पक्ष वंचित समाजाला सत्तेपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. काहीही झालं, तरी माझा पक्ष कायम राहणार असल्याचं आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
हेही वाचा-
मनसे समर्थकांचं अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर
राज ठाकरेंकडून आदित्यच्या निर्णयाचं स्वागत