..तेव्हाच शिवसेनेसोबत चर्चा, काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेच्या मुद्द्यांवर एकमत झाल्यानंतरच शिवसेनेसोबत चर्चा करण्यात येईल, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली.

SHARE

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेच्या मुद्द्यांवर एकमत झाल्यानंतरच शिवसेनेसोबत चर्चा करण्यात येईल, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली.

शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवर विचारविनीमय करण्यासाठी काँग्रेस नेते अहमद पटेल, सी. वेणूगोपाळ आणि मल्लिकार्जुन खर्गे हे शरद पवार यांना भेटण्यासाठी मंगळवारी मुंबईत आले होते. त्यानुसार त्यांनी पवार यांच्यासोबत सुमारे २ तास चर्चा केली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं.

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अहमद पटेल म्हणाले की,

सोमवारी अधिकृतरित्या शिवसेनेकडून पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपर्क साधण्यात आला. आम्ही दोन्ही पक्ष एकत्ररित्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो होतो. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी वेगळी विचारधारा असलेल्या शिवसेनेला सोबत घ्यायचं की नाही? तिघांनी मिळून सत्ता स्थापनेचा दावा करायचा असल्यास तिघांमधील किमान समान कार्यक्रम काय असेल? अशा व्यापक मुद्द्यांवर एकमत होणं आवश्यक आहे. आमच्या दोन्ही पक्षांचं ठरल्यानंतरच आम्ही शिवसेनेसोबत चर्चा करू.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला सोमवारी पाठिंब्यासाठी पत्र देणं अपेक्षित होतं, पण दोन्ही पक्षांनी ऐनवेळी पत्र देण्याचं टाळल्याने सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे गेलेली शिवसेना तोंडघशी पडली याबद्दल विचारणा केली असता शरद पवार यांनी सांगितलं की, आमची आघाडी काँग्रेससोबत आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही शिवसेनेला पत्र देणं शक्य नव्हतं. शिवसेनेने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही काँग्रेससोबत बोलणी केली. या प्रक्रियेला कुठलाही उशीर झाला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आमच्यात अजून निर्णय झालेला नाही. सत्ता स्थापनेच्या व्यापक मुद्द्यांवर आधी आमच्यात चर्चा होईल. संयुक्त सरकारमध्ये सत्ता वाटप कसं होईल? इ. मुद्द्यांवर आमच्या एकमत झाल्यावरच पुढचा निर्णय घेण्यात येईल.

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने चर्चेसाठी आमच्याकडे भरपूर वेळ असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला. हेही वाचा-

शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाहीच

Live Updates- मातोश्रीबाहेरचे पोस्टर अखेर हटवलेसंबंधित विषय
ताज्या बातम्या