महाशिवआघाडीचा मसुदा तयार? सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे...

महाशिवआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, ​काँग्रेस आणि राष्ट्रवादी​​​ काँग्रेसमध्ये गुरूवारी संध्याकाळी पहिल्यांदाच एकत्रितरित्या बैठक झाली.

  • महाशिवआघाडीचा मसुदा तयार? सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे...
SHARE

महाशिवआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुरूवारी संध्याकाळी पहिल्यांदाच एकत्रितरित्या बैठक झाली. या बैठकीत तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा होऊन कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आल्याचं खात्रीलायक कळतं आहे. या मसुद्याला तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी मान्यता दिल्यास सत्ता स्थापनेच्या दिशेने पुढचं पाऊल पडणार आहे. 

हेही वाचा- सत्तापेच रविवारी सुटणार? पवार-सोनिया यांची रविवारी दिल्लीत भेटीची शक्यता

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १०५ जागा मिळालेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयशी ठरल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. तर दुसऱ्या बाजूला वेगळ्या विचारधारेच्या शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायचं की नाही यावर काँग्रेस-राष्ट्रवादीत खल सुरू होता. तिन्ही पक्षांनी मिळून एकत्ररित्या सरकार चालवायचं असल्यास काही मुद्द्यांवर सहमती आवश्यक असल्याने किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात यावा, हे निश्चित करण्यात आलं. त्यानुसार आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर नंतर शिवसेनाही या कार्यक्रमातील मसुद्यावर चर्चा करण्यास सहभागी झाली.


गुरूवारी सायंकाळी पहिल्यांदाच तिन्ही पक्षांचे नेते यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले. या बैठकीत शिवसेनेकडून विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक, छगन भुजबळ आणि काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय-धोरणं आखण्यासंबंधी विचार विनिमय करण्यात आला.

यासंदर्भात माहिती देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, केवळ सरकार स्थापन करणं हे आमचं ध्येय नसून सरकार पुढील ५ वर्षे सक्षमपणे चाललंही पाहिजे. त्यासाठी तिन्ही पक्षांनी मिळून किमान समान कार्यक्रमातील मुद्द्यावर चर्चा करून अंतिम मसुदा तयार केला आहे. या मसुद्याला तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी मान्यता दिल्यावर तो उघड करण्यात येईल. राज्यात लवकर सरकार स्थापन व्हावं अशी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळं सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी लवकर निर्णय घेतल्यास सत्ता स्थापन करण्यात काहीही अडचण येणार नाही.

त्यानुसार आता सर्वांचं लक्ष काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात रविवारी होऊ घातलेल्या भेटीकडे लागलं आहे.   हेही वाचा-
राष्ट्रवादीचे ९ आमदार संपर्कात, भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा दावा

उद्धव ठाकरे -अहमद पटेल यांची बैठक झालीच नाही; अफवा पसरवणं बंद करा - संजय राऊतसंबंधित विषय
ताज्या बातम्या