Advertisement

आमचं सरकार सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यास वचनबद्ध राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आमचं सरकार सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
SHARES

स्वतःचं हक्काचं  घर असावं, असं प्रत्येक सर्वसामान्याचं स्वप्न असतं. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात झाली आहे. यापुढील काळातसुद्धा महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यास वचनबद्ध राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांसाठी असलेल्या ४४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३६७० यशस्वी अर्जदारांना घरांचं ऑनलाईन वाटप, तसंच निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. (maharashtra cm uddhav thackeray inaugurated cidco housing project )

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न वास्तवात आणणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ही माझ्यासाठी अनोखी भेट आहे. पूर्वी इंग्रजांनी थंड हवेची ठिकाणे विकसित केली, त्याठिकाणी राहण्याच्या सोयी केल्या. शहरालगत इतक्या जवळ आणि विमानतळापासून हाकेच्या अंतरावरील खारघर हेवन हिल्स वसाहत ही देखील एकप्रकारे वैशिष्ट्यपूर्ण हिल स्टेशन बनेल.  

हेही वाचा - पोलिसांना मिळणार हक्काचे घर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील सिडकोच्या या उपक्रमांचं कौतुक केलं. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलसांसाठी अशा प्रकारे पहिल्यांदाच सिडकोच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत असं सांगितलं. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आणखीही घरे पुढील टप्प्यात सिडकोने उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये रू. १ कोटीची मदत करण्यात आली . सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सिडकोतर्फे या माध्यमातून योगदान करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगारमंत्री नवाब मलिक, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी उपस्थित होते

हेही वाचा - कोरोनाच्या विळख्यात ठाकरे सरकार!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement