Advertisement

मुख्यमंत्र्यांनी घेतली आमदारकीची शपथ, मुख्यमंत्रीपदावरील संकट अखेर दूर

मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरील संकट अखेर दूर झालं आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली आमदारकीची शपथ, मुख्यमंत्रीपदावरील संकट अखेर दूर
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सोमवार १८ मे रोजी दुपारी विधानपरिषद (vidhan parishad) सदस्यत्वाची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरील संकट अखेर दूर झालं आहे. ठाकरे यांच्यासोबत इतर ८ जणांची नुकतीच विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होते.

इतर सदस्यही बिनविरोध

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ ९ उमेदवारांचे अर्जच शिल्लक उरल्याने या सर्वांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड तर भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील आणि रमेश कराड हे बिनविरोध आमदार बनले आहेत.

हेही वाचा - विधान परिषद निवडणूक: उद्धव ठाकरे बिनविरोध बनले आमदार

गोपनीयतेची शपथ

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अत्यंत साधेपणाने झालेल्या शपथविधी सोहळ्यात या सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

उद्धव ठाकरे यांनी २७ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली असल्याने त्यांना ६ महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी कुठल्याही एका सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक होतं. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं असतं. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावर टांगती तलवार कायम होती. 

त्यानंतर महाविकास आघाडी तसंच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला विधानपरिषद निवडणूक घेण्याची विनंती केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा