Advertisement

मी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पाहणी करतोय, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

मी केवळ फोटोसेशन करायला आलेलो नाही, कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली.

मी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पाहणी करतोय, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा
SHARES

तौंते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना मोठा तडाखा दिला असून येथील फळबागा आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी कोकणात दाखल झाले. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन दिलं. सोबतच मी केवळ फोटोसेशन करायला आलेलो नाही, कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, असं म्हणत विरोधकांवर टीका केली. शिवाय मी हेलिकाॅप्टरमधून नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरुन पाहणी करतोय, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

तौंते चक्रीवादळाने जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे पूर्ण होताच संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी रत्नागिरी इथं दिली.

जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळ नुकसानीचा प्राथमिक आढावा मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते.

तौंते चक्रीवादळाने जिल्ह्यातील ५ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यात अधिक नुकसान राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. जिल्ह्यात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसंच नारळाच्या बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पद्धतीने करुन नेमकेपणाने आकडेवारीसह प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

हेही वाचा- महाराष्ट्रालासुद्धा केंद्राकडून मदत मिळणार- देवेंद्र फडणवीस

मोठ्या प्रमाणावर नुकसान

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केलं. या चक्रीवादळात जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू झाला असून ८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या ११ आहे. जिल्ह्यात १७ घरे पूर्णत: बाधित झाली असून अंशत: बाधित घरांची संख्या ६७६६ आहे. यात सर्वाधिक दापोलीत  २२३५आहेत. रत्नागिरी तालुक्यात १०८४ तर राजापुरातील ८९१ घरांचं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या गोठ्यांची जिल्ह्यातील संख्या ३७० इतकी आहे. वादळात वाऱ्यामुळे १०४२ झाले पडली. यात सर्वाधिक ७९२ झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या २५० इतकी आहे. चक्रीवादळात ५९ दुकाने व टपऱ्यांचं नुकसान झालं. नुकसान झालेल्या शाळांची संख्या ५६ आहे. या सर्व शाळा राजापूर तालुक्यामधील आहेत.

शेती

चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर फळबागांचं नुकसान झालं. अंदाजे ११०० शेतकऱ्यांचं साधारण २५०० हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं. यातील ३४३० शेतकऱ्यांच्या  ८१०.३० हेक्टरवरील पंचनाम्यांचं काम आजपर्यंत पूर्ण झालं आहे.

वीज

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात १२३९ गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत ११७९ गावांचा पुरवठा आता पूर्ववत करण्यात आला आहे.

बाधित उपकेंद्राची संख्या ५५ व फिडरची संख्या २०६ आहे. याची दुरुस्तीदेखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे ४८५ खांब बाधित झाले असून यापैकी १२५ पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या १२३३ इतकी आहे. यातील १३३ खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.

मत्स्य व्यवसाय

जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी ३ बोटी पूर्णत: तर ६५ बोटींचं अंशत: नुकसान झालं. ७१ जाळ्यांचंही नुकसान झालेलं आहे. अंदाजित नुकसान ९० लाख रुपयांपर्यंत आहे. या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या ३०१ मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे १ कोटी ९८ लाख ८४ हजार पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.

(maharashtra cm uddhav thackeray visits ratnagiri after cyclone tauktae)

हेही वाचा- महाराष्ट्राचंही वादळाने नुकसान, मग पंतप्रधानचा दौरा गुजरातलाच का?- नवाब मलिक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा