Advertisement

महाराष्ट्रालासुद्धा केंद्राकडून मदत मिळणार- देवेंद्र फडणवीस

रोज सकाळी टीव्हीसमोर जाऊन खोटे बोलण्यासाठी या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आणि नेत्यांची नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्रालासुद्धा केंद्राकडून मदत मिळणार- देवेंद्र फडणवीस
SHARES

तौंते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्राला सुद्धा मदत मिळणार, हे कालच केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. तरीही ‘केंद्र सरकारने करावं-केंद्र सरकारने दिलं नाही’, अशी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची ठरलेली स्क्रिप्ट आहे. रोज सकाळी टीव्हीसमोर जाऊन खोटे बोलण्यासाठी या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आणि नेत्यांची नियुक्ती झाल्याचं आता जनतेलासुद्धा कळून चुकलं आहे, असं वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस तौंते वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, या चक्रीवादळाचा लँडफाॅल हा गुजरातमध्ये झाला. त्याठिकाणी ४५ लोकं मृत्यूमुखी पडले. खूप मोठ्या प्रमाणात गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याठिकाणची पाहणी करून तात्काळ मदत घोषित केली. पण त्या मदतीची जी काही प्रेसनोट आहे, त्यातच लिहिलेलं आहे की इतर राज्यांना देखील मदत होणार आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान राज्यांसोबतच दीव-दमण अशा केंद्रशासित प्रदेशांना मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा- हा भेदभाव का?, गुजरातच्या मदतनिधीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा पंतप्रधानांना प्रश्न

कालची घोषणा झाल्यानंतर इतर कुठल्याही राज्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण त्या सगळ्यांनी ते वाचलेलं आहे की केंद्र सरकार सगळ्या राज्यांना मदत करणार आहे. आता यामध्ये तामिळनाडू किंवा केरळ ही काही भाजपची राज्ये नाहीत. तर गोवा आणि कर्नाटक ही भाजपची राज्ये आहेत. तरी देखील काल घोषणा गुजरातची झाली आहे. या सगळ्या राज्यांना मदत मिळणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

एवढंच नाही, तर एसडीआरएफ हा राज्याकडे असतो, केंद्र सरकार एनडीआरएफमधून एसडीआरएफमध्ये पैसे आगाऊ देतं. ते पैसे आपल्याला मिळाले आहेत. अशा प्रकारच्या वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना या निधीतूनच पैसे राज्याने वापरायचे असतात. ते पैसे केंद्र सरकार परत करत असतं. केंद्राचेच ते पैसे असतात. हे सगळं राज्याला माहीत आहे. असं असताना यावर जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

(maharashtra will get relief fund from central government after tauktae cyclone says devendra fadnavis)

हेही वाचा- महाराष्ट्राचंही वादळाने नुकसान, मग पंतप्रधानचा दौरा गुजरातलाच का?- नवाब मलिक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा