Advertisement

हा भेदभाव का?, गुजरातच्या मदतनिधीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा पंतप्रधानांना प्रश्न

तौंते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरात राज्याचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आर्थिक मदतीची घोषणा देखील केली आहे.

हा भेदभाव का?, गुजरातच्या मदतनिधीवरून पृथ्वीराज चव्हाणांचा पंतप्रधानांना प्रश्न
SHARES

तौंते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरात राज्याचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आर्थिक मदतीची घोषणा देखील केली आहे. यावरून हा भेदभाव का ? बाकीच्या राज्यातील पीडित जनतेच्या प्रति आपली काही जबाबदारी नाही का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

तौंते चक्रीवादळाने सर्वात आधी गोवा त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात अशा राज्यांना जोरदार तडाखा दिला. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई-ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. खासकरून कोकण, रायगडमधील अनेक बागा उद्ध्वस्त झाल्या, घरांचं मोठं नुकसान झालं. मच्छिमारांच्या बोटींचं नुकसान झालं. वीजवाहिन्यांचे खांब मोडून पडल्याने हजारो गावांना अंधारात रात्र काढावी लागली. मुंबई, ठाण्यात झाडे उन्मळून पडल्याने गाड्यांचं मोठं नुकसान झालं. अशा तऱ्हेने हजारो कोटी रुपयांचं नुकसान या चक्रीवादळाने केलं.

हेही वाचा- Cyclone Tauktae : 'तौंते'मुळं राज्यात ६ जणांचा मृत्यू

तसंच नुकसान गोवा, दीव-दमण आणि गुजरातच्या काही भागांतही झालं. या चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीव-दमण आणि गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी केली. त्यानंतर गुजरातमधील नुकसानग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक देखील पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे.

सायक्लोन तौंतेमुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्ये प्रभावित झाली आहेत. पण प्रधानमंत्री मोदींनी फक्त गुजरात चा दौरा केला व त्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव का ? बाकीच्या राज्यातील पीडित जनतेच्या प्रति आपली काही जबाबदारी नाही का? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील तौंते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचंही मोठं नुकसान झालं आहे. तेव्हा पंतप्रधानांनी महाराष्ट्राचीही पाहणी करायला हवी होती. जेणेकरून येथील नुकसानग्रस्त जनतेलाही दिलासा मिळाला असता, असं मत व्यक्त केलं होतं.

(prithviraj chavan demands financial aid for maharashtra from pm narendra modi after tauktae cyclone)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा