Advertisement

मुंबई काँग्रेसचा पाय खोलात!

जिथं अप्पलपोटे नेतेच पक्षाशी गद्दारी करताहेत तिथं कार्यकर्त्यांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा तरी कुणी कशी करू शकतं? असा खडा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे.

मुंबई काँग्रेसचा पाय खोलात!
SHARES

विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होण्याआधीच मुंबई काँग्रेसचा पाय खोलात गेलेला दिसतोय. काँग्रेस नेत्यांमध्ये जिंकण्याची उमेद तर सोडाच पक्षात टिकून राहण्याचीही आस उरलेली नाहीय. जिथं अप्पलपोटे नेतेच पक्षाशी गद्दारी करताहेत तिथं कार्यकर्त्यांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा तरी कुणी कशी करू शकतं? असा खडा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांच्या या नाराजीला कारण ठरलंय ते पक्षबदलू, जबाबदारीपासून पळ काढणारे आणि एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या अडकवणारे काँग्रेस नेते.

मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला. राजीनामा देताना मुंबई काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नेमणूक करण्याचा सल्लाही त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिलाय. परंतु त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. देवरा आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. हे मतभेद देखील यानिमित्ताने समोर आलेत. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये जणू राजीनामासत्र सुरू झालंय. प्रत्येक राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठण्याचा सपाटाच लावलाय. यांत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या नावांचासुद्धा समावेश आहे. राहुल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झालंय. या पदावर कुणाला आणून बसवायचं हा काँग्रेसच्या सर्वच मातब्बर नेत्यांना पडलेला पेच अजूनही सुटलेला नाहीय. अशा स्थितीत एका बाजूला राहुल गांधींना सिम्पथी दाखवताना किंवा लोकसभा निवडणुकीतील पराभवाची ‘सो काॅल्ड’ जबाबदारी स्वीकारताना राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आपल्या नावाचा देखील विचार व्हावा, असा अप्रत्यक्ष संदेश देवरांनी या राजीनाम्यातून दिल्याचं निरूपम यांना वाटतंय. त्यामुळे तिळपापड झालेल्या निरूपम यांनी देवरांवर ट्विटरवरून निशाणा साधताना त्यांना मतलबी म्हणून संबोधलंय. हा राजीनामा आहे की वरच्या पदावर जाण्याची शिडी? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

अर्थातच निरूपम यांचा हा टोमणा देवरा समर्थकांना कसा पचेल? त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते भाई जगताप यांनी निरूपम यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. काही नेते काँग्रेसी असल्याचा दावा करतात. पण तेच जातीयवाद आणि भाषावादाचं राजकारण करतात. ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवतात. इतकं सगळं करूनही तब्बल अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत होतात. अशा 'कर्मठ' नेत्यांपासून सावध राहायला हवं. अशा शब्दांत जगताप यांनी निरूपम यांच्या वर्मावर बोट ठेवलं.  

तसं बघायला गेल्यास बिनधास्त आणि बेधडक वृत्तीचे निरूपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना काँग्रेस कार्यकर्ते नेहमीच चार्ज असायचे. नोटाबंदी विरोधात केलेलं आंदोलन, महागाई-वीजदरावाढीविरोधात केलेलं आंदोलन, पकोडा आंदोलन असो किंवा फेरीवाल्यांची बाजू घेऊन मनसेशी घेतलेला पंगा असो काँग्रेस कार्यकर्ते सातत्याने निरूपम यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज असायचे. छटपूजा आयोजनाच्या माध्यमातून तर त्यांनी कार्यकर्त्यांना नवा इव्हेंटही उपलब्ध करून दिला. पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसाठी नेहमीच अॅव्हेलेबल असलेले निरूपम म्हणूनच सर्वांना जवळचे वाटायचे. याच जोरावर निरूपम  आपल्यापाठी उत्तर भारतीयांसोबत एकनिष्ठ कार्यकर्त्यांची लाॅबी तयार करू शकले.  परंतु ओव्हरस्मार्ट निरूपम यांचं इथंच चुकलं की त्यांना आपल्या कार्यकाळात मुंबईच नाही, तर राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत जुळवून घेता आलं नाही. त्यामुळे देवरा, प्रिया दत्त यांच्यासहीत ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची नाराजी त्यांना ऐन लोकसभा निवडणुकीआधी भोवली.  

एकेकाळी मुंबई काँग्रेसमध्ये गुरूदास कामत आणि दुसऱ्या बाजूला मुरली देवरा असे दोनच गट होते. मुरली देवरा यांच्यानंतर हा वारसा मिलिंद देवरांकडे आला. निरूपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर मुंबई काँग्रेसमध्ये ३ गट तयार झाले. २०१८ मध्ये कामत यांच्या निधनानंतर कामत गटातील बहुतेक पदाधिकारी देवरांच्या गोटात सामिल झाले. तेव्हापासून देवरा विरूद्ध निरूपम असा कलगीतुरा सुरू झाला. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीत मुंबई काँग्रेसची धुरा निरूपम यांच्याकडून काढून अपेक्षेनुसार देवरा यांच्या हाती सोपवली असली, तरी देवरा यांना या निवडणुकीत कुठलाही चमत्कार दाखवता आला नाही. मुंबईतील ६ पैकी एकाही जागेवर काँग्रेस आघाडीला विजय मिळवता आला नाही. राज्यातही काँग्रेसला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. अशा निर्णायक स्थितीत खासकरून विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन नव्या लढ्याची तयारी करण्यास सज्ज होण्याऐवजी देवरा यांनी राजीनामा देत सपशेल शरणागती पत्कारली. 

हेही वाचा-राज यांना हाताची साथ? दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट

राष्ट्रवादीसोबतची आघाडी फायद्याची की तोट्याची, वंचित बहुजन आघाडीचं उभं ठाकलेलं आव्हान, मनसेची निवडणुकीतली भूमिका असा सगळा गुंता सद्यस्थितीत काँग्रेसला सोडवायचाय. त्यादृष्टीकोनातून पाहता एलिट क्लासमध्ये रमणाऱ्या देवरांकडे ही मोठी संधी होती. तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून त्यांची मोट बांधता आली असती, त्यांना प्रोत्साहीत करता आलं असतं. विधानसभेसाठी रणनिती आखता आली असती. पण देवरांनी ही संधी हातची गमावली. आधी निरूपम यांना खाली खेचलं आणि नंतर स्वत: कुठलीही कर्तबगारी न दाखवता पदावरून पायउतार झाले. ‘तुला न मला घाल कुत्र्याला’ असा हा प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांना खासकरून निरूपम समर्थकांना रूचलेला नाही. त्यातच काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकरच्या ‘लेटर बाॅम्ब’ने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नाराजीत आणखीनच भर पडलीय.लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी अभिनय क्षेत्रातून राजकारणाच्या रिंगणात उडी मारत उर्मिला काँग्रेसतर्फे उत्तर मुंबई मतदारसंघातून लढली होती. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी उर्मिलाचा पराभव केला. त्यानंतर उर्मिलाने १६ मे रोजी मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पराभवाची कारणमिमांसा करणारं पत्र लिहिलं होतं. हे नाराजी पत्र नुकतंच प्रसिद्धी माध्यमांच्या हाती पडलं. 

या ९ पानी पत्रात उर्मिलाने आपल्या पराभवाचं सर्व खापर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर फोडलंय. स्थानिक काँग्रेस नेत्यांमधील मतभेद, स्थानिक स्तरावर नेतृत्वाची कमी, कमकुवत प्लानिंग आणि संजय निरूपम यांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचाराचं न केलेलं काम यामुळे आपला पराभव झाल्याचं उर्मिलाने या पत्रात म्हटलंय. हे पत्र उघड झाल्याने नाराज उर्मिला काँग्रेसचा हात सोडून भाजपाचा झेंडा खांद्यावर घेईल किंवा शिवबंधनात अडकेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.  

हेही वाचा- वंचित पुढे काँग्रेसच वंचित? ४० जागांचा प्रस्ताव देऊन केली थट्टा

या पत्रासोबतच उर्मिलाचं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेलं आणखी एक पत्रंही समोर आलं. या पत्रात 'राहुल गांधी यांच्या सन्मानार्थ मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा स्वीकारू नये. कारण मुंबई काँग्रेसला मिलिंद देवरांसारख्या नेत्याची गरज आहे', असं लिहिलेलं आहे. अशा सर्व गदारोळात उर्मिलाचं पत्र नेमकं फोडलं कुणी? यावरूनही तर्क वितर्क लढवले जात आहेत. संजय निरूपम यांनी उर्मिलाचं पत्र फोडण्यात मिलिंद देवरा यांचा हात असल्याचा आरोप केलाय. तर अत्यंत गोपनीय असलेलं पत्र फुटणं हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उर्मिलाने दिलीय.

राधाकृष्ण विखे पाटलांनी ऐन मोक्याच्या क्षणी भाजपात जात मंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतल्यापासून तर राज्यातील इतर काँग्रेस नेत्यांची अवस्था आणखीच दयनीय झालीय. विखेंसोबत डझनभर मंत्री भाजप-शिवसेनेत जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बाधून उभे होते. परंतु यापैकी कुणाचीही डाळ शिजू शकली नाही. त्यामुळे या नेत्यांची अवस्था कुणी पक्षात घेतं का पक्षात? अशी आर्त हाक मारणाऱ्या भंगण फकीरासारखी झालीय. सत्ताधाऱ्यांचे उंबरठे झिजवत करूण नजरेने फिरणारे काँग्रेस नेते कार्यकर्त्यांना आणखीनच खुजे वाटू लागलेत. निवडणुकीआधीच मनाने हार पत्करलेल्या काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्याकडे पाहून पुढची सत्ता आमचीच असेल, असं भाजपा-शिवसेनेचे नेते छातीठोकपणे सांगू लागलेत. एवढंच नाही, तर महायुतीच्या नेत्यांना आपल्या विजयाबद्दल इतकी खात्री आहे की, मुख्यमंत्री कुणाचा होणार? यावरून त्यांच्यात खल सुरू झालाय. 

अशा स्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षाच्या मुळाशी उठलेल्या काँगेस नेत्यांच्या नौंटकीकडे बघत राहण्यावाचून कुठलाच पर्याय उरलेला दिसत नाहीय.  

  


हेही वाचा-

मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजीला पुन्हा उधाण, ‘हे’ काँग्रेसचे नेतेच करताहेत एकमेकांवर चिखलफेक

मिलिंद देवरा यांनी दिला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा


Disclaimer: All views expressed in this article are personal and purely as per the author. Mumbai Live holds no opinion on the content of the article and does not promote any particular view or sentiment.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा