Advertisement

तर, कर्ज काढून तौंते नुकसानग्रस्तांना मदत करा, काँग्रेसची राज्याकडे मागणी

राज्य सरकारने कर्ज काढून तौंते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

तर, कर्ज काढून तौंते नुकसानग्रस्तांना मदत करा, काँग्रेसची राज्याकडे मागणी
SHARES

आपत्तीप्रसंगी केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, हा लोकांचा अधिकार आहे. पण जर केंद्र सरकारने पैसे नाहीच दिले, तर राज्य सरकारने कर्ज काढून तौंते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

तौंते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणच्या रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील पाहणी दौऱ्यावर असताना नाना पटोले यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी जाऊन मच्छीमारांची व विविध नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली व समस्या ऐकून घेतली. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, तौंते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागातील लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अशा स्थितीत त्यांना भरीव मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्तांना मदत मिळणं, हे अपेक्षित आहे. केंद्राकडून राज्याला किंवा नुकसानग्रस्तांना मदतनिधी मिळत असेल, तर ती काय भिक नव्हे, हा राज्याचा आणि लोकांचा अधिकाराच आहे. 

हेही वाचा- मी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पाहणी करतोय, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

जर केंद्र सरकारने नुकसानग्रस्तांना मदत केली नाही, तर वेळप्रसंगी राज्य सरकारने कर्ज काढून लोकांना भरीव मदत केलीच पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

याआधी कोकणच्या दौऱ्यावर गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी, कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिलं आहे, आता शिवसेना कोकणाला किती देते, हे बघणं महत्त्वाचं आहे. कोकणावर राजकारणासाठी जेवढं प्रेम केलं जातं, तितकंच प्रेम अशा संकटाच्या काळातसुद्धा केलं जावं, अशी आमची अपेक्षा आहे. निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी हेक्टरी ५० हजार म्हणजे एका झाडाला ५०० रूपये मदत घोषित केली होती. मात्र त्यावेळी जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये. मुख्यमंत्र्यांनी भरघोस मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे, असं वक्तव्य केलं होतं.

तर तौंते चक्रीवादळाने जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे पूर्ण होताच संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी रत्नागिरी इथं दिली.

(maharashtra congress president nana patole demands financial aid for cyclone tauktae affected people)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा