Advertisement

“इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार?”, मोदी सरकारला प्रश्न

‘नजरचुकीने’ केलेली व्याजदर कपातीची ‘चूक’ सुधारली; पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

“इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार?”, मोदी सरकारला प्रश्न
SHARES

‘नजरचुकीने’ केलेली व्याजदर कपातीची ‘चूक’ सुधारली; पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. 

नाना पटोले यांनी मागील काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारला सुनावलं आहे. नाना पटाेले म्हणाले की, नजरचुकीने झालेली चूक १२ तासांनी सुधारली असली, तरी ७ वर्षांपासून पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किमती वाढवण्याची केलेली ‘घोडचूक’ मोदी सरकार कधी सुधारणार?

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून कोणताही दिलासा देणारा निर्णय घेतला गेलेला नाही. प्रत्येक निर्णय हा चुकीच्या पद्धतीने घेऊन जनतेला वेठीस धरण्याचं काम केलं जात आहे. नोटबंदी, जीएसटी, नियोजन न करता लावलेलं लॉकडाऊन या मोदी सरकारच्या चुकांमुळे देश अधोगतीकडे गेला. छोटे, लहान, मध्यम उद्योगांची स्थिती अत्यंत अवघड झाली आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली.

हेही वाचा- ठेवीदारांना दिलासा, पीपीएफ व्याजदरात कपातीचा आदेश चुकून निघाला

निवडणुका तोंडावर असल्या की भाजपकडून अशा नजरचुका होतच असतात! लोकांनी काबाडकष्टाने कमावलेल्या पैशांवर असे चुकून निर्णय घेतात. पण काय करणार देश चुकीच्या हातात गेल्यावर अशा चुका होतच राहणार. सध्या भाजप सरकारने देश विकायला काढलाय याची त्यांना जाणीव आहे ना? उद्या परत म्हणायला नको नजरचुकीने विकला गेला म्हणून!, असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.

दरम्यान, पब्लिक प्राॅव्हिडंट फंड (पीपीएफ)सह सगळ्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये १ एप्रिलपासून कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घोषित केला होता. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मोठा धक्का बसला होता. या निर्णयावर नोकरदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाला असल्याचं सांगितलं. व्याजदरात कुठलाही बदल केला गेला नसल्याचं निर्मला सीतारमन यांनी ट्विट करून म्हटलं आहे. त्यामुळे व्याजदर ‘जैसे थे’ च राहणार आहेत.

(maharashtra congress president nana patole slams modi government over fuel price hike)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा