Advertisement

पेट्रोल-डिझेल शंभर पार, काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात पेट्रोल पंपांवर आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असून इंधनावरील सेस रद्द करण्याची मागणीही उचलून धरली जात आहे.

पेट्रोल-डिझेल शंभर पार, काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात पेट्रोल पंपांवर आंदोलन
SHARES

एका बाजूला लाॅकडाऊनमुळे जनतेचं आर्थिक गणित बिघडलेलं असताना, त्यात दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडायची वेळ आली आहे. या इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसच्या (congress) वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असून इंधनावरील सेस रद्द करण्याची मागणीही उचलून धरली जात आहे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर १८ रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसंच पेट्रोलवर प्रति लिटर २.५० तर डिझेलवर प्रति लिटर ४ रुपये कृषी सेस घेतला जातो. या दरोडेखोरी विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता राज्यभर एकाचवेळी १ हजार ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ३ पेट्रोल पंपांवर आंदोलन करून काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. 

हेही वाचा- ४५ दिवस उलटूनही घरकामगार, रिक्षा चालकांना पॅकेज नाही- चंद्रकांत पाटील

केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित यूपीएचं सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.

परंतु आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटलं आहे, अशी टीकाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 

त्यानुसार पेट्रोल-डिझेल शंभर पार मोदी बस्स करा..जनतेची लूटमार, पगार कपात-नोकरी जाण्याची भीती, त्यात सततची पेट्रोल-डिझेलची दरवाढ सामान्य माणसाने जगायचं तरी कसं? अशा आशयाचे बॅनर हाती घेऊन काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्यातील ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपांवर जाऊन मोदी सरकारचा निषेध करत आंदोलन केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा