Advertisement

सिंगलस्क्रीन थिएटर सुरू करा, सुप्रिया सुळेंचाही मागणीला पाठिंबा

एकपडदा थिएटर चालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी विनंती राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

सिंगलस्क्रीन थिएटर सुरू करा, सुप्रिया सुळेंचाही मागणीला पाठिंबा
SHARES

राज्यात गेल्या ५ महिन्यांपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्यातील एकपडदा थिएटर चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे एकपडदा थिएटर चालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी विनंती राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. (maharashtra government must solve single screen theater owner problems says ncp mp supriya sule)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये सर्वात पहिल्यांदा सिनेमागृह बंद करण्यात आली होती. तेव्हापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून सिनेमागृह बंदच आहेत. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अटी-शर्थींच्या आधारे लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथिल केलं आहे. परंतु अद्याप सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. 

सिनेमागृह बंद असल्याने एकही नवा सिनेमा लाॅकडाऊनच्या काळात रिलिज होऊ शकलेला नाही. कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या सिनेक्षेत्रावर हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. 

हेही वाचा - Raj Thackeray: मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे

सिनेमागृह बंद असल्याने त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाती रोजगार उरलेला नाही. सिनेमागृहांची साखळ असलेल्या मोठ्या कंपन्यांनाही नुकसान होत असलं, तरी ते सहन करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. परंतु एकपडदा सिनेमागृह चालवणाऱ्या मालकांची मात्र यामुळे मोठी आर्थिक कोंडी झालेली आहे. 

त्यामुळे महाराष्ट्रात सिनेमागृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन आणि फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून करण्यात येत आहे. त्यासंबंधीचं निवेदन दोन्ही संस्थेतर्फे खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आलं. त्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकपडदा थिएटर्स बंद आहेत. यामुळे राज्यातील एकपडदा थियटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. ती पुन्हा सुरु करावीत या मागणीचं निवेदन 

सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी दिलं आहे. यामध्ये एकपडदा थियटरचालकांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. कृपया एकपडदा थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना करत सिनेमागृह चालकांना आपला पाठिंबा दिला आहे.  


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा