Advertisement

महाराष्ट्राने २५ कंपन्यांशी केले ६१ हजार कोटी रुपयांचे करार

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून महाराष्ट्राने मागील वर्षभरात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे.

महाराष्ट्राने २५ कंपन्यांशी केले ६१ हजार कोटी रुपयांचे करार
SHARES

महाराष्ट्र सरकारने देशातील आघाडीच्या कंपन्यांसोबत मंगळवारी ६१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. त्यातून अडीच लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात सुपर मॅग्नेटिक पाॅवर असून ती कुणी हिरावून घेऊ शकणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथिगृह येथे २५ भारतीय कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत ६१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. या माध्यमातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून महाराष्ट्राने मागील वर्षभरात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. कोविड संकटाच्या काळात सहा महिन्यांतच एक लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, घरातून ताकद मिळाल्यानंतर हत्तीचे बळ मिळते. उद्योजक हे महाराष्ट्राच्या परिवारातील सदस्य आहेत. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. राज्य आणि देशाप्रतिची निष्ठा महत्त्वाची. मी माझ्या देशाच्या प्रगतीसाठी काम करतो ही भावनाच खूप मोलाची आहे.

कोविडचे संकट टळलेले नाही. सध्या कोरोनाची परिस्थिती समाधानकारक असली तरी युरोपात स्ट्रेन वेगाने पसरतोय. या गुंतवणुकीत पिझ्झा, आइस्क्रीम आहे. शेततळे आहे, दूध आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राला तुमची ताकद मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत उद्योग करारांचा हा तिसरा टप्पा आहे. करार होत असलेल्या सर्व कंपन्या भारतातील आहेत. यापूर्वी २९ करार झाले आहेत. त्यापैकी २१ उद्योगांना जमिनी देण्यात आल्या. दरम्यान, सुभाष देसाई यांनी गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रत्येक उद्योगासाठी रिलेशन मॅनेजरची नियुक्ती केली आहे.

प्रमुख गुंतवणूकदार आणि त्यांची गुंतवणूक 
जेएसडब्ल्यू स्टील - २० हजार कोटी रुपये गुंतवणूक - ३ हजार रोजगार

इंडियन कॉर्पोरेशन लॉजिस्टिक - ११०४९.५ कोटी - ७५ हजार रोजगार

के. रहेजा - ७५०० कोटी - ७० हजार रोजगार

बजाज ऑटो - ६५० कोटी - २५०० रोजगार

कीर्तिकुमार स्टील - ७५०० कोटी - ६० हजार रोजगार

इन्स्पायर इन्फ्रा (औरंगाबाद) लि. - ७५०० कोटी - १० हजार रोजगार 

एक्साइड इंडस्ट्रीज -५०० कोटी - १ हजार रोजगार

गोयल गंगा -१ हजार कोटी - १० हजार रोजगार



हेही वाचा-

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'स्मार्ट सहेली' योजना

मुंबई-ठाण्यात पोलिसांची संचारबंदी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा