Advertisement

विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही!, असं राजेश टोपे का म्हणाले?

ही घटना राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत, असं टोपे म्हणाले होते.

विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही!, असं राजेश टोपे का म्हणाले?
SHARES

विरारमधील दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याचं वक्तव्य करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागल्यावर आपल्या वक्तव्याचा प्रसार माध्यमांनी विपर्यास केल्याचं त्यांनी शुक्रवारी म्हटलं. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत राजेश टोपे (rajesh tope) देखील सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारपरिषद घेत राजेश टोपे यांनी विविध मुद्यांबाबत माहिती दिली. 

यावेळी प्रसारमाध्यमांनी विरार दुर्घटनेच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर विचारणा केली असता, राजेश टोपे म्हणाले, मी अत्यंत संवेदनशीलतेने काम करणारा कार्यकर्ता आहे. सामान्य माणसाला त्रास होऊ नये यासाठी मी संपूर्ण संवेदनशीलतेने काम करत आलेलो आहे. माध्यमांना या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. तुम्ही मला आजच पाहात आहात असं नाही, गेल्या वर्षभरापासून कोविड काळात मी कसं काम करतोय हे माध्यमं एवढंच नाहीतर राज्यातील जनता देखील बघत आहे. माझ्यावर आलेल्या अतिदुःखाच्या प्रसंगात देखील मी माझं कर्तव्य व जबाबदारीला नेहमीच महत्व दिलेलं आहे. ही घटना घडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देणारा मंत्री मीच होतो. 

हेही वाचा- “केंद्राला जी लस १५० रुपयांना ती राज्यांना ४०० रुपयांत का?”

सर्व माध्यमांना प्रतिक्रिया देताना मी स्पष्टपणे सांगितलं की ही अत्यंत दुर्दैवी व दुःखद घटना आहे. मनाला व हृदयला अतिशय पिळवटून टाकणारी घटना आहे. मृत्यू झालेल्यांच्या परिवारातील लोकांच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी आहोत. या सगळ्या परिस्थितीत जे काही राज्य शासन म्हणून करणं शक्य आहे ते सर्व आम्ही करणार आहोत. तसंच सर्व गोष्टींची चौकशी केल्यावर निष्काळजीपणा आढळून आल्यास कडक कारवाई देखील करून. फक्त शब्दाचा विपर्यास करू नये एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. यानंतर मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येक ५ लाखांच्या मदतीची घोषणा सरकारकडून जाहीर करण्यात आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्येकी २ लाखांची घोषणा केली.

त्यानंतर पंतप्रधानांसोबतच्या बैठकीअगोदर प्रसारमाध्यमांनी या घटनेबाबत काही चर्चा करणार का? असा प्रश्न विचारल्यावर पंतप्रधान मोदींशी आम्ही ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात बोलणार आहोत. ही घटना राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत, असं टोपे म्हणाले होते.

(maharashtra health minister rajesh tope reacts on virar hospital fire statement)



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा