Advertisement

बावनकुळेंनी स्वत:चं हसं करून घेऊ नये- अनिल देशमुख

मुंबई वीज खंडित प्रकरणी भाष्य करून चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वत:चं हसं करून घेऊ नये, असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हाणला आहे.

बावनकुळेंनी स्वत:चं हसं करून घेऊ नये- अनिल देशमुख
SHARES

मुंबईतील वीज खंडित होण्याचा प्रकार हा पूर्णपणे मानवनिर्मित असून त्यात चीनने केलेल्या सायबर हल्ल्याचा हात असल्याचा गृहमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी केलेला दावा आपलं अपयश झाकण्यासाठी होता, असा आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केला होता. परंतु या विषयावर भाष्य करून बावनकुळेंनी स्वत:चं हसं करून घेऊ नये, असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हाणला आहे.

मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचं हसं करून घेऊ नये, अनिल देशमुख म्हणाले आहेत. 

गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबईत झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृह इथं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांना नुकताच सोपवला.

हेही वाचा- “मुंबई काळोखात बुडण्यासाठी 'हेच' जबाबदार, चिनी सायबर हल्ल्याचा दावा खोटा”

मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या प्रकरणी घातपाताच्या शक्यतेच्या दृष्टीकोनातून तपास करणं आवश्यक वाटल्याने ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासाबाबत त्यावेळी विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आले होते. 

रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनॅलिसिस या अमेरिकन कंपनीने २८ फेब्रुवारी रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालात त्यांनी असं म्हटलं आहे की, मुंबईच्या इलेक्ट्रीकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीन देशाने मालवेअर (व्हायरस) टाकला असल्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची बातमी १ मार्च रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रातही तसंच वॉलस्ट्रीट जर्नल मध्येही प्रसिद्ध झाली आहे, अशी माहिती अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी यावेळी दिली होती. 

त्यावर टीका करताना, वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार पूर्णत: मानवनिर्मित आहे. यात कोणत्याही देशाचा संबंध नाही. १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली, ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी नवीन शक्कल लढवत चीनच्या सायबर हल्ल्याचं कारण देत जनतेची दिशाभूल करणं सुरू केलं आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.

(maharashtra home minister anil deshmukh replies chandrashekhar bawankule on mumbai electricity failure)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा