Advertisement

विधिमंडळाचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरपासून

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईतच घेण्यात येणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधिमंडळाचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरपासून
SHARES

राज्य विधीमंडळाचं (maharashtra legislative assembly) हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईतच घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री ॲड.अनिल परब, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, सतेज पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी संकट अजून टळलेलं नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय विधानमंडळाने घेतला आहे. यासाठी १२ आणि १३ डिसेंबर रोजी विधानभवन परिसरात तपासणी शिबीर घेतलं जाणार आहे.

यासंदर्भात विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा- महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही- उद्धव ठाकरे

या अधिवेशनासाठी येणाऱ्या राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांसह विधानभवन आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. ज्यांची कोरोना (coronavirus) चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना विधानभवनात प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकांची वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार तपासणी शिबिरात एकूण सात बुथ उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर तपासणी झालेल्यांना अहवाल प्राप्त करुन घेण्यासाठी टोकन देण्यात येणार आहेत. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल अशा रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. रुग्णांनी घाबरुन न जाता तपासणी शिबिरातील आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

ज्यांना शासनमान्य खासगी प्रयोगशाळेत तपासणी करावयाची आहे, त्यांनी अधिवेशनाला येताना आपला अहवाल १२ आणि १३ तारखेचाच असला पाहिजे याची नोंद घ्यावी.

सामाजिक अंतराचं पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था पावसाळी अधिवेशनाप्रमाणे करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असणार आहे. आमदारांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि वाहनचालकांची बसण्याची तसंच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू टाकून करण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

(maharashtra legislative assembly 2 day winter session will start from 14th december in mumbai)

हेही वाचा- योगींच्या येण्याने उद्धव ठाकरेंची झोप उडालीय, कॅबिनेट मंत्र्यांचा पलटवार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा