Advertisement

राज्यपालांचं अभिभाषण गुजरातीत, मुख्यमंत्र्यांना मागावी लागली माफी

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठीच्या मुद्यावरून अधिवेशन गाजेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण आमदारांना राज्यपालांचं अभिभाषण मराठीऐवजी गुजरातीत ऐकू आल्याने विरोधक चांगलेच संतापले. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी जाहीर माफी मागवी लागली.

राज्यपालांचं अभिभाषण गुजरातीत, मुख्यमंत्र्यांना मागावी लागली माफी
SHARES

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मराठीच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला. धर्मा पाटील, कोरेगाव-भीमा हिंसाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारखे अनेक विषय विरोधकांच्या हातात असताना पहिल्याच दिवशी मराठीच्या मुद्यावरून अधिवेशन गाजेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण आमदारांना राज्यपालांचं अभिभाषण मराठीऐवजी गुजरातीत ऐकू आल्याने विरोधक चांगलेच संतापले. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी जाहीर माफी मागवी लागली.


नेमकं काय झालं?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली, ती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने. राज्यपालांनी इंग्रजीतून अभिभाषणाला सुरूवात केली खरी, पण कानाला हेडफोन लाऊन अनुवादीत भाषण ऐकणाऱ्या आमदारांना हे भाषण मराठीतून नव्हे, तर चक्क गुजरातीतून ऐकू आलं.


तरीही अभिभाषण सुरूच

गुजरातीत अभिभाषण कानावर पडताच विरोधक चांगलेच संतापले आणि त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला.


मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी

एकीकडे गुजरातीत ऐकू येणाऱ्या अभिभाषणावरून सत्ताधाऱ्यांचा निषेध होत असताना दुसरीकडे राज्यपालांचं भाषण गोंधळात सुरूच होतं. त्यामुळे विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजीला सुरूवात केली. सरतेशेवटी हा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येऊन विधानसभेत जाहीर माफी मागितली.


चौकशीच्या सूचना

ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करू, असं आश्वासन दिलं. संध्याकाळपर्यंत दोषींवर कारवाई होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. राज्यपालांनीही या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीच्या सूचना दिल्या आहेत.


हा तर १२ कोटी मराठी भाषिकांचा अपमान

राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी नव्हे तर गुजराती अनुवाद एेकवत भाजपाने १२ कोटी मराठी भाषिकांचा अपमान केल्याचा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येलाचा मराठीचा, मराठी भाषिकांचा असा अपमान होत असताना शिवसेना गप्प कशी असा सवाल करत पवार यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.

- आ. अजित पवार, राष्ट्रवादी


जाणीवपूर्वक अवमान

आक्रमक झालेल्या विरोधकांनी आता अभिभाषण अनुवादाच्या मुद्यावरून सत्ताधार्यांना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी भाजपाकडून मराठी भाषेचा जाणिवपूर्वक अवमान करण्यात आल्याचा आरोप करत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे मराठी भाषेचा पुळका असलेली शिवसेना या अवमान नाट्यात सहभागी असणं ही दुर्देवाची गोष्ट असल्याचं म्हणत शिवसेनेच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला आहे.

-सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी,

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा