SHARE

'नमस्कार, मी तर शपथ घेतली आहे. आपणही शपथ घ्या, आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करा. चला फेरीवालामुक्त मुंबईच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया...' असं आवाहन करणारा व्हिडिओ तुमच्या व्हाॅट्सअॅपवर आल्यास आश्चर्यचकीत होऊ नका. मुंबई फेरीवालामुक्त करण्याचं आवाहन करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ही अनोखी शक्कल लढवली असून हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.  

मनसेने काढलेला संताप मोर्चा, त्यानंतरचं फेरीवाल्यांना हुसकावून लावण्यासाठी केलेला प्रयत्न आणि बुधवारी काँग्रेस मोर्चामध्ये घुसून केलेला राडा यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना विरोध करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे.


मनसे आक्रमक  

फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या मनसेने सोशल मीडियाचा वापर करत हे सोशल आंदोलन छेडल्यामुळे मनसैनिक सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. मुळात या कोणत्याही व्हिडिओमध्ये कुणाला धमकी वजा इशारा देण्यात आलेला नाही, तर शांतपणे मुंबईकरांना आवाहन करण्यात येत आहे. 


'यांचा' व्हिडिओ व्हायरल

अनेक कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटवण्याची शपथ घेऊन सोशल मीडियावर फेसबुक, व्हाट्सपद्वारे प्रचंड प्रमाणात व्हायरल केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. यांत मनसेचे संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी, मनसे कार्यकर्ते योगेश चिले यांचा व्हिडीओ विशेष व्हायरल होत आहे.

मनसे स्टाईल आता सोशल मीडियावर देखील धुमाकूळ घालणार का? मुंबईकरांच या सोशल मोहिमेला किती प्रतिसाद लाभणार? हे पाहणं येत्या काळात औत्सुक्याचं ठरणार आहे.हेही वाचा - 

न्यायालयाने दिलेले निर्देश पाळा, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

फेरीवाल्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेसचा दादरमध्ये मोर्चा


संबंधित विषय
ताज्या बातम्या