राज्यातील फटाकेबंदीचा बार फुसका, रामदास कदम यांचा 'यू टर्न'


SHARE

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यात फटाक्यांवर बंदी आणणार असल्याचं वक्तव्य पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांसमोर केलं होतं. पण या वक्तव्याला २४ तासही उलटत नाही तोच 'यू टर्न' घेत कदम यांनी राज्यात फटाकेबंदीचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. यावरून पर्यावरणमंत्र्यांचा फटाकेबंदीचा हा बार फुसकाच ठरल्याचं दिसत आहे. 


टीकेनंतर सूर बदलला

पर्यावरणमंत्र्यांच्या फटाकेबंदीच्या विचारावर कडाडून टीका करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'रोजगार देता येत नसेल तर, आहे तो रोजगार काढून घेण्यात कसला पुरुषार्थ'? असा टोला सरकारला हाणला. जगभरात १९९ देशात फटाके फोडले जातात. मग आपणच गरीबांच्या चुली का विझवत आहोत'? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या वादात उडी घेत फटाकेबंदीला विरोध दर्शवला.  


कदमांचा 'यू टर्न'  

शिवसेनेतील आपल्या वरीष्ठ नेत्याकडून टीका झाल्यावर ताळ्यावर आलेल्या कदम यांनी महाराष्ट्रात फटाकेबंदी लागू करण्याचं आपण बोललोच नाही, असं म्हणत 'यू टर्न' घेतला.  


काय म्हणाले कदम?

आम्ही हिंदूत्ववादी आहोत. हिंदूंच्या सणावर निर्बंध येणार नाही आणि हे पाप शिवसेना तसेच मी करणार नाही. त्यामुळे फटाकेबंदीचा कुठलाही निर्णय घेणार नाही. फटाकेबंदी करणार नाही, पण प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, यासाठी जनजागृती मी करणार.


राज-राऊतांना कदमांचा टोला -

दिल्लीत फटाकेबंदी झालीच नाही, व्यापारी भागात फक्त फटाके विक्री करू नका, असं कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे ज्यांनी मंगळवारी प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी माहिती घ्यायला हवी होती, फक्त प्रसिद्धीसाठी बोलायचं नाही, असं म्हणत रामदास कदम यांनी संजय राऊत आणि राज ठाकरेंना चिमटा काढला.


उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन

आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. ते देखील काढा हवं तर. अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली आहेच. शांततेचा अतिरेक झाला तर, एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल.

- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख शिवसेना


हेही वाचा - 

फटाकेबंदीवरून राजकीय फटाक्यांची वात पेटलीडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय