Advertisement

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 'या' नेत्यांचा समावेश

मंत्रिमंडळात एकूण ७ जागा रिक्त आहेत. त्यानुसार मंत्रीमंडळ विस्तारात या ७ जागांपैकी कुठल्या नेत्यांना संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 'या' नेत्यांचा समावेश
SHARES

विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवार १६ जून रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु शिवसेनेसह इतर मित्रपक्षांची नाराजी, मंत्रिपदावरून पक्षांतर्गत कलहाने डोकं वर काढल्याने मंत्रीमंडळ विस्तार लांबला होता. मात्र फडणवीस यांनी आधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मंत्रीमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब केल्याचं समजत आहे.

एकूण ७ जागा

मंत्रिमंडळात एकूण ७ जागा रिक्त आहेत. त्यानुसार मंत्रीमंडळ विस्तारात या ७ जागांपैकी कुठल्या नेत्यांना संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. राजभवनातील दरबार हाॅलच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे नव्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवनातील गार्डन सज्ज ठेवण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्यात अंदाजे २५० ते ३०० जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. सोमवार १७ जूनपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हे नवे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.  

शिवसेना नाराज

एकाबाजूला केंद्रामध्ये केवळ १ मंत्रीपद मिळाल्याने शिवसेना नाराज आहे. शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपदाचा हट्ट सोडला असला, तरी राज्यात उपमुख्यमंत्रीपद मिळावं, हा शिवसेनेचा आग्रह कायम आहे. त्यातच इतर मित्रपक्षदेखील मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने नाखूश आहेत. या सर्वांना खूश करण्यासोबत पक्षाबाहेरुन आलेल्यांना मंत्रीपद वाटण्यावरुन भाजपामध्येही अंतर्गत कलह उफाळून आला आहे. हा अंर्तकलह देखील मुख्यमंत्र्यांना शांत करावा लागणार आहे.

उपमुख्यमंत्रीपद कुणाकडे?

मुख्यमंत्र्यांनी मोदी-शहा यांच्याबरोबरच शुक्रवारी 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करत काही नावं अंतिम केली आहेत. त्यानुसार या  विस्तारामध्ये शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपद जाण्याची दाट शक्यता आहे. या पदावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाला पक्षप्रमुखांनी पसंती दिली असली, तरी शिवसेनेच्या इतर नेत्यांमधून देसाई यांच्या नावाला विरोध होत आहे. त्यामुळे हे पद शिवसेनेच्या वाट्याला गेल्या या पदावर कुणाची वर्णी लागेल हे बघावं लागेल.

‘यांना’ वगळणार?

काँग्रेसमधून भाजपात दाखल होण्याची केवळ औपचारीकताच शिल्लक असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांनाही मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत कलह शमवण्यासाठी वादग्रस्त तसंच प्रभागी कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू देत त्यांच्या जागी नवे चेहरे आणण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यापैकी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे, गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीश आत्राम यांना मंत्रिमंडाळाबाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल.

‘या’ नव्या चेहऱ्यांचा समावेश

तर, त्यांच्या जागी मुंबई महापालिका, लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करणारे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आ. अतुल सावे, मोर्शीचे आ. डॉ. अनिल बोंडे या नव्या चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो. मंत्रीमंडळ विस्तारात रिपाइंलाही १ जागा मिळणार असल्याचे संकेत आहेत. त्यासाठी अविनाश महातेकर यांचं नाव सुचवल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यातर्फे देण्यात आली आहे.


या सर्व अंदाजानुसार शनिवारी रात्री कोण मंत्री आपापले राजीनामे सादर करतील आणि शपथविधीत कुणाचा समावेश असेल, हे रविवारीच कळेल.



हेही वाचा-

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला?

राज ठाकरेंनी कापला ५१ किलोचा ईव्हीएम केक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा