Advertisement

काँग्रेसच्या टेकूवर ठाकरे सरकार, नाना पटोले संतापले

संजय राऊत उठसूट काँग्रेसविरोधात बोलतच राहणार असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी शिवसेनेला दिला आहे.

काँग्रेसच्या टेकूवर ठाकरे सरकार, नाना पटोले संतापले
SHARES

राज्यातील ठाकरे सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलेलं आहे, हे शिवसेनेनं लक्षात ठेवावं. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) उठसूट काँग्रेसविरोधात बोलतच राहणार असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी शिवसेनेला दिला आहे.

भिवंडी शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी यूपीएचं अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर ते म्हणाले, संजय राऊत सातत्याने शरद पवारांची (sharad pawar) वकिली करताना दिसत आहेत, यावरून पवार राष्ट्रवादीत आहेत की शिवसेनेत हे तपासावं लागेल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून संजय राऊतांची भूमिका सांगणार आहे. त्यामुळे राऊतांनी शरद पवारांची वकिली बंद करावी, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.  

हेही वाचा- आधी अभ्यास करा, मगच बोला; संजय राऊतांचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

आम्हालाही विचार करावा लागेल

राज्यातील ठाकरे सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलेले आहे. हे शिवसेनेनं लक्षात ठेवावं. वारंवार बाजवून देखील संजय राऊत उठसूट काँग्रेसविरोधात बोलणार असतील, तर आम्हालाही विचार करावा लागेल, असा इशारा देखील नाना पटोले यांनी दिला आहे.  

काय म्हणाले होते राऊत? 

संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)संबंधी बोलण्यासाठी यूपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही. यूपीए हा काही राज्याचा विषय नाही, हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात विरोधी पक्षांची  एका मजबूत आघाडी निर्माण व्हावी ही काळाची गरज आहे. यूपीए मजबूत व्हावं असं काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना वाटत नसेल, तर त्यांनी तसं स्पष्ट करावं. हा दिल्लीतील विषय असल्याने महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये यावर चर्चा होऊ नये. तसंच राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये.

या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत. त्यामुळे मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल, तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली होती. 

(maharashtra thackeray government only because of support of congress says nana patole)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा