महापौरपदाची निवडणूक 8 मार्चलाच

 CST
महापौरपदाची निवडणूक 8 मार्चलाच

मुंबई - मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख अखेर जाहीर झाली असून येत्या 8 मार्चला ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तारखेबाबत घोळ निर्माण झाल्यामुळे बुधवारी विधी विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला. त्यात महापौर निवडणूक 8 मार्चला घेवू शकता, असा अभिप्राय देण्यात आला. त्यानुसार तारीख निश्चित करून दुपारी 12 वाजता ही निवडणूक घेतली जाणार आहे.

मुंबई महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांचा कालावधी हा 8 मार्चपर्यंत असल्यामुळे 9 मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला होता. परंतू दोन दिवसांपूर्वी या कार्यक्रमात बदल करून 8 मार्चलाच निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. याबाबत ‘मुंबई लाइव्ह’ने सर्वप्रथम बातमी देत निवडणुकीची तारीख उघडकीस आणली होती. ‘महापौरपदाच्या निवडणुकीत तारखेवरूनच राडेबाजी’ या शिर्षकाखाली दिलेल्या वृत्तानंतर शिवसेनेत एकच खळबळ माजली आणि शिवसेना नेते अनिल देसाई, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेतली. यांनी त्यावेळी 9 मार्चलाच निवडणूक घेण्याची मागणी केली. मात्र यावर महापालिका आयुक्तांनी विधी खात्याकडून अभिप्राय घेण्याच्या सूचना दिल्या त्यात विधी विभागाने 8 मार्चला निवडणूक घेवू शकता असा अभिप्राय दिला. त्यानुसार आयुक्तांनी निवडणुकीची तारीख 8 मार्च निश्चित करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे चिटणीस विभागाने नोटीफिकेशन काढली असून यामध्ये 8 मार्चला निवडणूक घेण्याचे जाहीर केले. या निवडणुकीसाठी शनिवारी 8 मार्च अर्ज भरण्याची मुदत आहे.

महापौर निवडणुकीची तारीख ठरवण्याचा अधिकार हा महापालिका आयुक्तांना आहे. त्याप्रमाणे आयुक्तांनी ही तारीख ठरवली असून विद्यमान नगरसेवकांचा कालावधी हा 8 मार्चपर्यंत असला तरी महापौर निवडणुकीसाठी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनाच पत्र पाठवण्यात येईल. विद्यमान नगरसेवकांना याची कल्पना देण्यात येणार नाही. त्यामुळे तारखेच्या घोळावरून विद्यमान आणि नवनिर्वाचित नरगसेवकांमध्ये होणाऱ्या राडेबाजीवर मात करण्याची रणनिती प्रशासनाने आखली आहे.

https://www.mumbailive.com/mr/election-2017/dating-with-the-date-of-mayoral-election-8493

Loading Comments