आरेतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश

 Goregaon East
आरेतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश
Goregaon East, Mumbai  -  

गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गोरेगाव पूर्वमधील आरे परिसरात केलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी म्हाडाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अरविंद जोशी यांना शपथपत्र सादर करण्याचा आदेश लोकआयुक्तांनी दिला आहे. व्यायामशाळेची व्यवस्था पाहणाऱ्या शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेची तसेच व्यायामशाळेत बसवलेली उपकरणे व इतर आरामदायी सोयी सुविधांबाबतची माहिती म्हाडाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अरविंद जोशी यांच्याकडून मागविण्यात आलेली आहे.

संजय निरुपम यांनी दावा केला आहे की, शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गोरेगाव पूर्व येथील आरे परिसरात अनधिकृत बांधकाम केले आहे. त्याविरोधात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी लोकआयुक्तांकडे केलेल्या तक्रारीची सुनावणी गुरुवारी होती. या सुनावणी दरम्यान लोकआयुक्तांनी शपथपत्र दाखल करण्याचा आदेश दिला.

आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी या व्यायामशाळेचे बांधकाम करण्याची शासनाची योजना होती. या व्यायामशाळेचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये तसेच व्यायाम शाळेलगत कोणतेही अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही या व्यायामशाळेचा व्यावसायिक वापर केला जात आहे. तसेच विविध संकल्पनाच्या नावाखाली तेथे अनधिकृत बांधकामही करण्यात आलेलं आहे, असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.

Loading Comments