भारतीय जनता पक्षाचे महाष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची मुंबई, दादर येथील कृष्णकुंजी निवासस्थानी भेट घेतली. या भेटीसंदर्भात बोलताना पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता फेटाळून लावली.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना भाजप-मनसे युतीबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, यावर माझा विश्वास आहे. नाशिकला आम्ही दोघेही जात असतो, पण योगायोगाने एक दिवस आमची भेट झाली. त्यावेळी आमच्यात अवघं १० मिनिटं बोलणं झालं. मुंबईत आल्यावर भेटायला घरी ये असं निमंत्रण त्यावेळी राज यांनी मला दिलं होतं. राज आणि माझी विद्यार्थी संघटनेत काम करत असल्यापासूनही ओळख आहे. परंतु निवांत बोलण्याचा योग कधी आला नव्हता. यानिमित्ताने तो मिळाला.
या भेटीत कुठल्या विषयांवर नेमकी चर्चा झाली? या प्रश्नाचं उत्तर देताना चंद्रकात पाटील (chandrakant patil) म्हणाले. दोन राजकीय नेते जेव्हा चहा प्यायला भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा होतेच. हे नाकारून चालणार नाही. परंतु ही भेट युतीच्या चर्चेसाठी नव्हती. तर मला राज ठाकरे यांनी नेमकी भूमिका समजावून घ्यायची होती. मध्यंतरी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या सभेतील भाषणाची एक क्लिप मला पाठवली होती. हे भाषण उत्तर भारतात बरंच व्हायरल झालं होतं. त्यावर माझ्या मनात काही प्रश्न होते. त्यावर चर्चा केली. त्यांनी त्यांची परप्रांतीय आणि भूमिपुत्रांविषयीची त्यांची भूमिका मला समजावून सांगितली.
हेही वाचा- लोकल प्रवासासाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकरांना टीसीने दंड ठोठावला
शिवसेनेचा एकेकाळी मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या दक्षिण भारतीयांना विरोध होता. परंतु जेव्हापासून त्यांचं येणं कमी झालं तेव्हा हा विरोधही मावळला. उत्तर भारतातील राज्यात तिथल्या सरकारांनी जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उभाराव्यात, जेणेकरून तेथील जनतेला कामधंद्यासाठी दुसऱ्या राज्यांत जावं लागू नये, असं राज यांचं म्हणणं असल्याचं त्यांनी मला सांगितलं. तसंच ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी नोकरीत ८० टक्के आरक्षण असावं असं ते म्हणतात, तसंच आरक्षण उत्तर भारतातील राज्यांमध्येही असावं, तिथंही माझी हीच भूमिका राहील. आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही, असंही राज यांनी स्पष्ट केल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
माझ्या मते राज ठाकरे हे राज्यातील एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचं अनेक विषयांवर स्वत:चं ठाम मत आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासात त्यांच्याही विचारांचं योगदान मिळावं असं जनतेला वाटतं. राज ठाकरे वा मनसेबद्दल जो एक नकारात्मक समज तयार झाला आहे, तो बदलला पाहिजे. ही नकारात्मक घालवण्यासाठी त्यांनी अधिक जोरकसपणे आपलं म्हणणं मांडावं, त्यांच्या कृतीतून ते दिसावं असं मला वाटतं.
केवळ एकमेकांची भूमिका समजावून घेण्यासाठीची ही भेट होती. या भेटीत भाजप-मनसे युतीचा कुठलाही प्रस्ताव नव्हता, असं पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा- म्हाडाच्या ८२०५ घरांसाठी १४ ऑक्टोबरला सोडत