Advertisement

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ : राज ठाकरे

राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एका पत्राद्वारे आभार मानले आहेत.

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ : राज ठाकरे
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. त्यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात १ मे रोजी राज ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पण सभेपूर्वीच राज ठाकरे यांच्या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारनं सर्व मशिदींवरील भोंगे काढले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचंच राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’. महाराष्ट्र सरकारला सदबद्धी मिळो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.   

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘बरं झालं राज ठाकरेंनी हे स्वत: मान्य केलं की सगळेच सत्तेचे भोगी आहेत. याचा अर्थ ते स्वत:सुद्धा योगी नाहीत, तेसुद्धा सत्तेचे भोगी आहेत. पण यासोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं की, ‘काहीही चुकीची माहिती देऊ नका, उत्तर प्रदेशमध्ये सगळेच्या सगळे भोंगे उतरवले गेले नाही आहेत.’

दरम्यान, सभेची परवानगी, पूर्वतयारीसाठी मनसे नेते नांदगावकर बुधवारी औरंगाबादेत आले. त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेतली.

‘आम्हाला आमचे म्हणणे मांडायचे आहे, त्यासाठी सभेला परवानगी मिळावी,’ अशी विनंती नांदगावकर यांनी १५ मिनिटांच्या चर्चेत केली. त्यावर “सर्व बाबींचा विचार करून २८ एप्रिल रोजी कळवतो,’ असे आयुक्तांनी उत्तर दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शिष्टमंडळात प्रवक्ते प्रकाश महाजन, मराठवाडा नेते दिलीप धोत्रे आणि जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने तसेच पोलिस उपायुक्त उज्ज्वला वनकर यांच्या नेतृत्वातील पथकाने मसांमंच्या मैदानाची पाहणी केली.



हेही वाचा

पुन्हा निर्बंध नको असतील तर स्वत:हून मास्क घाला - उद्धव ठाकरे

शिवाजी पार्कात नमाज पठणासाठी परवानगी द्या, औरंगाबादच्या वकिलाची मागणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा