Advertisement

जोपर्यंत हे सत्तेत आहेत, तोपर्यंत रस्ते सुधारणार नाहीत - अमित ठाकरे

अमित ठाकरे हे शुक्रवारी कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत. रस्त्यावर खड्डे असल्यामुळं अमित ठाकरे हे लोकलनं कल्याण डोंबिवलीकडे रवाना झाले.

जोपर्यंत हे सत्तेत आहेत, तोपर्यंत रस्ते सुधारणार नाहीत - अमित ठाकरे
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाके यांचे सुपुत्र अमित ठाकरे आता राजकारणात हळुहळू सक्रीय होत आहेत. अमित ठाकरे हे शुक्रवारी कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत. रस्त्यावर खड्डे असल्यामुळं अमित ठाकरे हे लोकलनं कल्याण डोंबिवलीकडे रवाना झाले. दादर स्थानकावरुन त्यांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास लोकल पकडून, ते कल्याण डोंबिवलीला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हे सुद्धा होते.

राज्यभरात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्याबाबत अमित ठाकरे यांनी नुकतीच एक पोस्ट लिहून सरकारवर हल्लाबोल केला होता. नाशिकमध्ये मनसेनं चांगले रस्ते बांधले. रस्ते बांधणे हे रॉकेट सायन्स नाही. आम्ही ५ वर्षात नाशिकमध्ये चांगले रस्ते बांधले, तुम्ही २५ वर्षात का नाही बांधू शकत, असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारला.


नाशिकमध्ये चांगले रस्ते झाले, अन्यत्र का नाही?

राजसाहेबांची इच्छाशक्ती होती, त्यामुळे नाशिकमध्ये चांगले रस्ते झाले. नाशिकमध्ये विकासकामं झाली. यापुढे नाशिकला ४० वर्ष पाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर हे स्वत: रस्त्यावर उतरुन खड्डे बुजवण्याचे आदेश देत होते, पण सध्या रस्त्याची स्थिती तशीच आहे, तुमची प्रतिक्रिया काय असं अमित ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर 'रस्ते नाहीच सुधारणार, जोपर्यंत हे सत्तेत आहेत, तोपर्यंत नाहीच सुधारणार, मी तुम्हाला बोललो, रस्त्यावर आलेले नेते आहेत ते तीन दिवस दिखावा म्हणून आलेले आहेत. तीन चार दिवसात लोक विसरतील, त्यानंतर काहीही होणार नाही', असं म्हटलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा