Advertisement

आरेतील आगीची न्यायालयीन चौकशी करा- बाळा नांदगावकर

आरे काॅलनी म्हणजे मुंबईचं फुफ्फूस आहे. या परिसरातील झाडं तोडून जर कुणी शहरातील आॅक्सिजन संपवण्याचं काम करत असेल, तर अशा व्यक्तींवर कारवाई होणं गरजेचं आहे, असंही नांदगावकर म्हणाले.

आरेतील आगीची न्यायालयीन चौकशी करा- बाळा नांदगावकर
SHARES

गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीमध्ये लागलेल्या भीषण आगीची सरकारनं तातडीनं न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी दुपारी दिंडोशी इथं मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी आरे कॉलनीतील वारंवार आगी कशा लागतात? जमीन हडपण्याच्या उद्देशाने ही आग लावण्यात आली होती का? याची सविस्तर चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.


कधी लागली आग?

आरे कॉलनीतील जंगलात सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता भीषण आग लागली. आग लागलेला भाग डोंगराळ असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अग्निशमन दलाच्या १०० जवानांनी पायी जाऊन रात्री १२.३० सुमारास आगीवर नियंत्रण मिळवलं.


जमीन हडपण्यासाठी

काही वर्षांपूर्वी सरकारने ही जागा काही बिल्डरांना नाममात्र दरात उपलब्ध करून दिली होती. त्यावर आयटी पार्क आणि रहिवासी इमारती उभारून बिल्डरने कोट्यवधी रुपये कमावले. मात्र अजूनही पोट न भरल्याने बिल्डरांनी आजूबाजूची जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातूनच ही आग लावण्यात आल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला.


कडक कारवाई

आरे काॅलनी म्हणजे मुंबईचं फुफ्फूस आहे. या परिसरातील झाडं तोडून जर कुणी शहरातील आॅक्सिजन संपवण्याचं काम करत असेल, तर अशा व्यक्तींवर कारवाई होणं गरजेचं आहे, असंही नांदगावकर म्हणाले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून या आगीची तात्काळ चौकशी करावी व नुकसान झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावावी, अशी मागणी करतानाच मनसे याप्रकरणी हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

आरे काॅलनीतील आग ६ तासांनंतर नियंत्रणात, संशयाचा धूर मात्र कायम

आरे कॉलनीजवळील डोंगरावर भीषण आग, वनसंपदा धोक्यात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा