अरेरे, मनसेचं कार्यालयही गेलं!


SHARE

मागील महापालिकेत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक काठावर निवडून आले असले, तरी मनसेला पक्ष कार्यालय मिळालं होतं. मात्र आता मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे महापालिका मुख्यालयातील त्याचं कार्यालयही जाणार आहे.


मराठी कर्मचारी होणार बेरोजगार

एका बाजूला मराठी माणसाच्या मुद्द्यावरून मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं. मनसे कार्यालय हातचं जाणार असल्यामुळे कार्यालयातील दोन मराठी कर्मचारी बेकारीच्या खाईत लोटले गेले आहेत.


किमान ५ नगरसेवकांना कार्यालय

मुंबई महापालिकेत किमान ५ नगरसेवक असलेल्या पक्षाला गटनेते पद देऊन त्यांना पक्ष कार्यालय देण्याचा ठराव गटनेत्यांच्या सभेत करण्यात आला होता. त्यानुसार ज्या पक्षाचे ५ पेक्षा अधिक नगरेसवक आहेत, त्यांना पक्ष कार्यालय उपलब्ध करून दिले जातं.

परंतु मनसेचे ६ नगरसेवकच पक्ष सोडून गेल्यामुळे त्यांचा एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिल्लक राहिले आहेत. या एकमेव नगरसेवकासाठी कार्यालय देता येणार नसल्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांकडून कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर महापालिका सभागृहात अधिकृत घोषणा केली जाईल आणि त्यानंतर हे कार्यालय महापालिका ताब्यात घेईल, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.


शिवसेनेला मोठं कार्यालय

महापालिका मुख्यालयातील नव्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सर्व पक्ष कार्यालये ही जुन्या इमारतीतील तळ मजल्यावर आणली जात आहेत. परंतु शिवसेनेने आपलं पक्ष कार्यालय मोठं असावं असाच आग्रह धरला आहे. त्यातच आता त्यांची संख्या ९१ वर पोहोचल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला देणाऱ्या दालनासह मोठ्या कार्यालयावर दावा ठोकणार आहे.


आधीच प्रयत्न सुरू

शिवसेनेने, भाजपाला देण्यात येणारे दालन आपल्याला मिळावे म्हणून आधीच प्रयत्न सुरु केले आहेत. मनसे महापालिकेतील अस्तित्वच संपल्यामुळे त्यांना देण्यात येणारं दालन आता राष्ट्रवादीच्या पारडयात पडणार आहे. यापूर्वी मनसेचे दिलीप लांडे व सपाचे रईस शेख यांनी आपली कार्यालये ताब्यात घेतली नव्हती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनाही त्यांनी कार्यालय ताब्यात घेऊ नये, अशी विनंती केली होती. त्यामुळे आजवर काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाने नव्या कार्यालयात प्रवेश केलेला नाही.


४ दिवसांतच आली वेळ

चार दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेण्यासाठी मुख्यालयात आल्यानंतर, पक्ष कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी, असा आग्रह संदीप देशपांडे यांनी धरला होता. परंतु राज ठाकरे यांनी या कार्यालयात जाण्यास नकार दिला. परंतु आता चार दिवसांत हे कार्यालय गमावण्याची वेळ मनसेवर आली आहे.हेही वाचा - 

कसली एकनिष्ठा? जाणून घ्या, मनसेची साथ सोडणाऱ्यांची राजकीय पार्श्वभूमी

ऐतिहासिक! पक्षांतरबंदी कायद्यानंतर महापालिकेत पहिल्यांदाच फुटले नगरसेवकडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय