Advertisement

राजू पाटील विमानतळ आंदोलनात सहभागी, मनसेची नेमकी भूमिका काय?

राजू पाटील विमानतळ आंदोलनात सहभागी झाल्याने या प्रश्नी मनसेची नेमकी भूमिका काय? असे प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यावर राजू पाटील यांनी आपलं म्हणणं मांडलं.

राजू पाटील विमानतळ आंदोलनात सहभागी, मनसेची नेमकी भूमिका काय?
SHARES

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचंच नाव देण्यात यावं, या मागणीसाठी भूमिपुत्रांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणमधील आमदार राजू पाटील देखील सहभागी झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असलं पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. असं असूनही राजू पाटील या आंदोलनात सहभागी झाल्याने या प्रश्नी मनसेची (mns) नेमकी भूमिका काय? असे प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यावर राजू पाटील यांनी आपलं म्हणणं मांडलं.

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. या मागणीसाठी दि. बा. पाटील कृती समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येत आहे.

सिडकोच्या मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त आणि इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्ते सकाळपासून सिडको कार्यालयाकडे रवाना होत आहेत. आंदोलकांना जागोजागी पोलिसांच्या नाकाबंदीचा सामना करावा लागत असला, तरी पोलीस जिथं अडवतील, तिथंच ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका दि.बा.पाटील कृती समितीने घेतली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव असावं?, राज ठाकरे म्हणाले…

तर नवं नाव..

या आंदोलनात मनसेचे आमदार राजू पाटील देखील सहभागी झाले. त्यावर प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता ते म्हणाले, नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीत भाग असेल, तर तांत्रिक बाब म्हणून विमानतळाला आपोआप शिवरायांचं नाव येईल. ती काही आमची मागणी नाही. पण राज ठाकरे यांनी या विषयावर मत केल्यावर सगळेजण म्हणायला लागले की ही आमची मागणी आहे. परंतु हे नाव आधीच देण्यात आलेलं आहे. 

परंतु हे विमानतळ पूर्णपणे नवं असेल तर त्याला दि. बा. पाटील यांचंच नाव देण्यात यावं. आम्हाला संघर्ष करायचा नसून आमची ताकद दाखवायची आहे. खरंतर ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती. एकीकडे तुम्ही तिसरी लाट येणार सांगत असताना आम्हाला रस्त्यावर उतरायला का लावलं? त्यांना जर फिकीर नसेल तर आम्हालाही नाही. आम्ही आमच्या मागणीसह रस्त्यावर आलो आहोत, असं राजू पाटील यांनी सांगितलं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

आता नवी मुंबईत होणारं विमानतळ हे मुंबई विमानतळाचं विस्तारीत विमानतळ आहे. माझ्या माहितीनुसार, मुंबईतील विमानतळ हे देशांतर्गत विमानसेवेसाठी असेल आणि नवी मुंबईतील नवं विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. त्यासाठीच शिवडी-न्हावा शेवा मार्ग होत आहे. त्यामुळे ते जरी नवी मुंबईत, पनवेलमध्ये होत असलं तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. म्हणूनच या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच नाव योग्य राहील असं मला वाटतं, असं मत राज ठाकरे (raj thackeray) यांनी व्यक्त केलं होतं.

j;j[- जिथं पोलीस अडवतील तिथं आंदोलन, दि.बा.कृती समितीची भूमिका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा